इचलकरंजी
ड्रीम – थर्टी सिक्स जुगाराचा सम्राट कोण?
कोल्हापूर जिल्ह्यात ड्रीम थर्टी सिक्स या सॉफ्टवेअरद्वारे कॅसिनो जुगार चालवण्यात येत आहे. या जुगाराचा कोल्हापूर शहरातील सम्राट कोण, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात लाल पडद्याच्या आड सुरू असलेल्या जुगारात श्रीमंत गरीब, असे सर्वच भिकेकंगाल होत आहेत. एक रुपयाला ३६ रुपये असा भाव असणारा हा जुगार सॉफ्टवेअरद्वारे चालवण्यात येतो. त्यामुळे खेळणारा अडकत जाणार व तो संपणार, अशी चलाखी सॉफ्टवेअरमध्ये आहे. त्यामुळे या जुगारात दररोज काही कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. केवळ एक सॉफ्टवेअर तयार करून आणि पोलिसांना हाताशी धरून हा जुगार राजरोज चालवण्यात येत आहे. सुरुवातीला जिल्हा पोलीस प्रमुखांनी अवैध धंदे हद्दपार करण्याची घोषणा केली होती. आता त्यांच्या डोळ्यांना अवैध धंदे दिसत नाहीत काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सदरचे जुगाराचे सॉफ्टवेअर कोणी तयार केले, जिल्ह्यात या जुगाराची सूत्रे कोण हाताळत आहे, या जुगारात दररोज कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याने त्यात पोलिसांचा वाटा किती म्हणून पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत आहेत, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
पालकमंत्री उघडा डोळे, पहा नीट
प्रत्यक्षात मोक्का कारवाई झालेला एक गुन्हेगार ड्रीम थर्टी सिक्स या जुगाराचा सम्राट असल्याची माहिती जिल्हाभर आहे. पोलिसांना हा जुगार कोण चालवतो याची संपूर्ण माहिती आहे. परंतु एक गुन्हेगार जुगार चालवत असताना त्याला कोल्हापूर जिल्ह्यात पाठीशी घालून गोरगरिबांचे खिसे रिकामी करण्याचा उद्योग सुरू आहे. शाहूनगरीत हा प्रकार घडतो आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मिरवणाऱ्या प्रकाश आबिटकर यांना हा प्रकार निदर्शनास येत नाही का, असा सवाल आहे.
