“डिजिटल” शाळा उभारण्यावर भर; “क्रीडा” क्षेत्राचा विकास करणार
उदगाव : प्रतिनिधी
“निवडणुकीच्या काळात कोणाकडे कल होता आणि कोणत्या गावाने किती मते दिली, या राजकारणापेक्षा आता मतदारसंघाचा विकास माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. सर्व मतभेद विसरून, प्रत्येक गावाला आणि प्रत्येक घटकाला सोबत घेऊन विकासाची गंगा घराघरांत पोहोचवणार आहे, तसेच खासगी शाळांच्या तोडीस तोड ‘डिजिटल’ शाळा उभारण्यावर राहणार विशेष भर; क्रीडा क्षेत्रात तालुक्याचा डंका वाजवणार” असा शब्द उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे नवनिर्वाचित सदस्य अमोल चव्हाण यांनी दिला.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर, मतदारसंघातील विविध गावांच्या भेटीदरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकाळातील विकासकामांचा ‘रोडमॅप’ जनतेसमोर मांडला.
अमोल चव्हाण यांनी शिक्षण क्षेत्रातील बदलांवर सर्वाधिक भर दिला आहे. ते म्हणाले की, “आज जिल्हा परिषद शाळांसमोर पटसंख्येचे मोठे संकट आहे. मात्र, योग्य सुविधा आणि दर्जेदार शिक्षण मिळाले तर पालक पुन्हा सरकारी शाळांकडे वळतील. माझ्या कार्यकाळात मतदारसंघातील एकही जिल्हा परिषद शाळा पटसंख्येअभावी बंद पडू देणार नाही. उलट, या शाळांना खासगी शाळांच्या स्पर्धेत उभे करण्यासाठी त्यांना ‘आदर्श शाळा’ म्हणून विकसित केले जाईल.” यातून सरकारी शाळांची शैक्षणिक क्रांती घडविण यामध्ये शाळांचे डिजिटलायझेशन: प्रत्येक वर्गात ई-लर्निंग, स्मार्ट बोर्ड आणि हाय-स्पीड इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल.
अद्ययावत पायाभूत सुविधा: पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छतागृहे आणि सुसज्ज वर्गखोल्यांचे बांधकाम तातडीने हाती घेतले जाईल. गुणवत्तेवर लक्ष: शिक्षकांसोबत संवाद साधून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा नियमित आढावा घेतला जाईल. तासेच केवळ शिक्षणच नव्हे तर शारीरिक विकासासाठीही अमोल चव्हाण यांनी मोठी घोषणा केली आहे. मतदारसंघातील प्रत्येक शाळेला आणि गावाला सुसज्ज क्रीडांगण उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
“तालुक्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये मोठी ताकद आहे, मात्र त्यांना योग्य मैदान मिळत नाही. दर्जेदार मैदानांच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचे नाव राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर नेण्याचे माझे स्वप्न आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
विजयाचा जल्लोष बाजूला ठेवून कामाला प्राधान्य देणाऱ्या चव्हाण यांनी स्पष्ट केले की, ज्या गावाने मला कमी मतदान केले असेल, तिथेही मी तितक्याच ताकदीने काम करणार आहे. “विकासकामांत कोणताही दुजाभाव केला जाणार नाही. ‘सर्वसामान्य माणूस’ हाच माझ्या कामाचा केंद्रबिंदू असेल,” या त्यांच्या भूमिकेचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
यावेळी स्थानिक ग्रामस्थ, तरुण वर्ग आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमोल चव्हाण यांच्या या सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे मतदारसंघाच्या विकासाला आता नवी गती मिळणार, अशी आशा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.