निशिकांत प्रचंडरावांच्या सुरेख, सुंदर व प्रामाणिक, निष्ठा पूर्ण आणि निर्विवाद सेवेच्या नोंदी त्यांच्याच “सेवा पुस्तकात” होणार !
प्रचंडरावांना सेवेची संधी न मिळाल्यास “32 हजार” बुडव्याच्या उपजीविकेसाठी “अमरत्व” कोण पाजणार ? जयसिंगपूरवाले ?, सर्व ठेकेदार ?
शिरोळ/कोल्हापूर : खमक्या वृत्तसेवा
शिरोळ नगर परिषदेचे प्रदीर्घ काळाच्या रजेवर असलेले मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या कामकाजाबद्दल जिल्हा पातळीवर प्रचंड नाराजी असून त्या पद्धतीचा अहवाल तयार करून विभागीय आयुक्तांना पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे समजते.
दरम्यान, जिल्हा पातळीवरून शिरोळ नगरपरिषदेला ई-मेलद्वारे पाठण्यात आलेल्या पत्रव्यवहारात मुख्याधिकारी प्रचंडराव यांच्या “सेवा पुस्तकात” शासकीय कामाचे निर्धारित वेळेत कर्तव्य बजावण्यात कसूर करणे,कामकाजात ढिलाई, कर्मचारी व कामकाज तसेच निकृष्ट दर्जाच्या बांधकामावर नियंत्रण नसणे, विनापरवाना, बेकायदेशीर बांधकामास मूखसंमती देणे, पाणी योजने संदर्भातील चुकीची माहिती जिल्हा पातळीवर देणे, अशा नोंदी करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्याचे चर्चेत आहे.
मुख्याधिकारी प्रचंडराव यांच्या सेवा पुस्तकात विविध प्रकारच्या नोंदी करण्याच्या आदेशामुळे नगरपरिषद कर्मचारी वर्तुळात खळबळ माजल्याचे समजते. परंतु, मुख्याधिकारी प्रचंडराव यांनी अनेकांना “अमरत्व” पाजून गोरगरिबांची बांधकामे बेकायदेशीररित्या पाडली.
त्या जागेवर 20 लोखंडी खोकी घालून देवून प्रती खोक्याला दरमहा 3,140 रुपये प्रमाणे उपजीविकेसाठी भाडेपट्टा निर्माण करून देण्याबरोबर अनेक महत्त्वपूर्ण कामे केली आहेत. याची जिल्हा पातळीवर दखल का घेण्यात आली नसावी असा प्रति सवाल केला जात आहे.
संपूर्ण शहरातील नागरिकांच्या सेवा सुख सुविधांना तिलांजली देऊन वेगवेगळ्या निधी योजनेतून “40 टक्के”च्या टक्केवारीतून एका राजकारण्याचे घर भरण्यासाठी आयुष्य, नोकरी पणाला लावणारे मुख्याधिकारी प्रचंडराव यांची बदली झाली तर, शहरावर शोककळा पसरेल, असे भाकीत शहरवासीय करीत असल्याचे समजते.
जिल्हा प्रशासनाने मुख्याधिकारी प्रचंडराव यांना पुन्हा सेवा करण्याची संधी न दिल्यास महाराष्ट्र शासनाच्या गाडीतून कुत्र्याला कोण फिरवणार ? महाराष्ट्र शासनाच्या गाडीचा बेकायदा वापर कोण करणार ?, स्वतःच्या गाडीत नगरपरिषदेच्या खात्यावर पेट्रोल डिझेल कोण भरणार ?, ठेकेदार मायबाप म्हणून कागदाचे बंडल घेऊन कोणाच्या दारात जाणार ? त्या “32 हजार” बुडव्याची उपजीविका कोण चालवणार ? यासह विविध प्रश्नावर शहरात चर्चेला उधान आले असल्याची समजते.