
डॉ. मगदूम ट्रस्टने बळकवलेली मोदी ट्रस्टची जागा सरकारी कब्जात येणार ?
जयसिंगपूर : खमक्या वृत्तसेवा
जयसिंगपूर येथील डॉक्टर एम. सी. मोदी ट्रस्टला दिलेली दोन एकर जागा सरकारी कब्जात घेण्याचे आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले होते. परंतु, या आदेशाला पुणे विभागीय आयुक्त अनिल रामोड यांनी सदरचा आदेश रद्द ठरविला आहे.आयुक्त रामोड पुढे काही दिवसातच लाच लुचपतच्या जाळ्यात सापडल्याने आणि त्यांच्याकडे कोट्यावधी रुपयांचे घबाड सापडल्याने हा आदेश अर्थपूर्ण व्यवहारातूनच रद्द करण्यात आल्याचा आरोप आता जयसिंगपूर परिसरातून होत आहे.
विभागीय आयुक्तांच्या वादग्रस्त आदेशाचा फेर आढावा घेऊन, सदरची जागा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे सरकारी कब्जात घेण्याची मागणी जयसिंगपूर शहर वासियातून होत आहे.
जयसिंगपूर येथील जगविख्यात नेत्र रोग तज्ञ डॉक्टर एम. सी. मोदी यांच्या कार्याला पाठबळ म्हणून शासनाने मोदी चॅरिटेबल ट्रस्टला दोन एकर एक गुंठा जमीन मोफत दिली होती. डॉक्टर मोदी यांच्या मृत्यूनंतर या जागेवर डोळा ठेवून मगदूम कुटुंबीयांनी डॉक्टर मोदी ट्रस्टमध्ये शिरकाव केला आहे. तसेच मोदी ट्रस्टला दिलेल्या जागेचा बेकायदेशीर वापर सुरू केला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या.
डॉक्टर मोदी ट्रस्टला सदरची जागा डोळ्यांचा दवाखाना, स्टाफ कॉर्टर्स, हेड कॉर्टर्स या कारणासाठी दिली होती, शिरोळ भूमी अभिलेख कार्यालयाने या जागेची तपासणी केली असता, मोदी ट्रस्टने ही जागा बेकायदेशीररित्या डॉक्टर जे. जे. मगदूम ट्रस्टला हस्तांतरित केल्याचे आढळून आले. सदर जागेवर नवीन दुमजली इमारत उभी करण्यात आली आहे या जागेत डॉक्टर जे. जे. मगदूम होमिओपॅथिक कॉलेज सुरू करण्यात आले आहे. या इमारतीसाठी जयसिंगपूर नगर परिषदेने डॉक्टर मगदूम ट्रस्टला बांधकाम परवानगी दिली आहे. याचा अर्थ सदर जागा मोदी ट्रस्ट कडून बेकायदेशीर रित्या हस्तांतरित करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

डॉक्टर जे. जे. मगदूम ट्रस्टने दि. 10 मे 2018 रोजी कॅन्टीन ठेकेदाराशी नोटरी करार केला असून त्याच्याकडून डिपॉझिट स्वरूपात 25 हजार रुपये व इमारत भाडे पाच हजार रुपये प्रति महिना, देण्याची अट नमूद करण्यात आली आहे. यावरून सदर जागेचा डॉक्टर मगदूम ट्रस्टने विनापरवाना वाणिज्य वापर सुरू केल्याचे आढळून आले. तसेच या जागेचे शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरण करण्यात आल्याचे उघड झाले. त्यामुळे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जमीन वापरा बाबतच्या अटींचा भंग झाल्याचा निष्कर्ष काढत सदरची जागा सरकारी कब्जात घेण्याचे आदेश दिले.
दरम्यान, या आदेशाला डॉक्टर मगदूम ट्रस्टने पुणे आयुक्तांकडे आव्हान दिले. पुणे विभागीय आयुक्त अनिल रामोड यांनी बेकायदेशीररित्या जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचा आदेश रद्दबातल ठरवला. हा आदेश रद्द ठरवणारे विभागीय आयुक्त पुढे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात कसे अडकले व त्यांच्याकडे किती कोटींचे घबाड सापडले. याचे सविस्तर वृत्त पुढील बातमीपत्रात पाहूया.
(VDO) जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश लाचखोर रामोड आयुक्तांकडून रद्द ! : https://youtu.be/PzscuRtuKNE?si=aFzbtIAUj7fMRDi6
मोदी ट्रस्ट ऐवजी मगदूम ट्रस्टला बांधकाम परवाना
डॉ. एम. सी. मोदी यांना शासनाने दिलेल्या दोन एकर जागेवर बांधकाम करण्यासाठी जयसिंगपूर नगरपरिषदेने मोदी ट्रस्टच्या नावे बांधकाम परवाना देणे आवश्यक असताना तो त्यांनी मगदूम ट्रस्टच्या नावाने दिल्याचे उघड झाले आहे. आता वादग्रस्त जागा आणि ट्रस्ट या चक्रात जयसिंगपूर नगरपरिषद अडकण्याची शक्यता बळावली आहे. मगदूम ट्रस्ट आणि नगरपरिषदेने संगणमत करून शासनाच्या डोळ्यात धुळ फेकून फसवणुक केल्याचे जयसिंगपूर वासियांचे मत आहे.

