पद्मभुषण डॉ. मोदींचे नाव पुसून टाकण्याचा विजय मगदूम यांचा डाव ?
कोट्यावधी रु. जागेच्या लालसापोटी डॉ.मोदी ट्रस्टवर केले आक्रमण ?
आता केवळ मगदूम ट्रस्ट असे नामांतर होणे बाकी.
जयसिंगपूर : खमक्या वृत्तसेवा
डॉक्टर एम. सी. मोदी हयात असताना डॉक्टर मोदी ट्रस्टकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस नसणाऱ्या विजय मगदूम यांनी डॉक्टर मोदी यांच्या निधनानंतर मात्र मोदी ट्रस्टमध्ये संशयास्पद पद्धतीने व गैर मार्गाने शिरकाव केला.
आता तर त्यांनी डॉक्टर मोदी यांची पत्नी व मुलगा अमरनाथ यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पत्नी सोनाली मगदूम व मुलगा प्रणव यांची ट्रस्टवर वर्णी लाऊन अख्खा मोदी ट्रस्टच व 25 कोटींची शासनाची दोन एकर जागा गिळंकृत केली आहे.
डॉक्टर एम.सी. मोदी यांना शासनाने त्यांच्या धर्मादाय कार्यासाठी व नेत्र रुग्णालयासाठी दोन एकर जागा मोफत दिली. या जागेचे आजचे बाजार मूल्य सुमारे 25 कोटी रुपये आहे. त्यामुळे मोदी ट्रस्ट कोट्यवधींच्या मालकीचा आहे.
मोदी ट्रस्टच्या कोट्यवधींच्या जागेवर डोळा ठेवून विजय मगदूम यांनी सुरुवातीला जयसिंगपूरातील एका विश्वस्ताला हाताशी धरून मोदी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळात घुसखोरी केलीच शिवाय स्वतःची सचिवपदी वर्णी लावली.
डॉक्टर मोदी हयात असताना या ट्रस्टचा कारभार मोदी ट्रस्टमार्फत चालवला जात होता. हा ट्रस्ट पूर्णतः सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या नियंत्रणाखाली चालला होता. डॉक्टर मोदी यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुवर्णा अध्यक्षा झाल्या तर मुलगा अमरनाथ उपाध्यक्ष झाला.
मोदी कुटुंबीय बेंगलोरमध्ये वास्तव्य करत असल्याचा फायदा घेत व त्यांना अंधारात ठेवत विजय मगदूम यांनी स्वतःची विश्वस्त मंडळावर वर्णी लावली. त्यानंतर डॉक्टर मोदी यांच्या पत्नी व त्यांचा मुलगा यांच्या जीवन मरणाबाबत नजर ठेवून डॉक्टर मोदी यांच्या पत्नी सुवर्णा व मुलगा अमरनाथ यांचा मृत्यू झाल्यानंतर तसा दाखला कोल्हापूर येथील धर्मादाय आयुक्तांकडे सादर करण्यात आला.
त्यानंतर डॉक्टर मोदी यांची पत्नी व मुलगा यांच्या रिक्त जागांवर मगदूम यांनी स्वतःची पत्नी ॲड. सोनाली मगदूम व मुलगा अर्णव मगदूम यांची वर्णी लावून अख्खा मोदी ट्रस्टच गिळंकृत केला आहे.
मोदी ट्रस्ट गिळंकृत केल्यानंतर मोदी ट्रस्टच्या उद्देशामध्येही बदल करण्यात आला आहे. मोदी ट्रस्टच्या उद्देशांमध्ये बदल केला असला तरी शासनाने ज्या उद्देशाने मोदी ट्रस्टला जागा दिली आहे, त्याच्या वापराबाबत नियम व अटींचा आत्ताच्या मोदी ट्रस्टने म्हणजे मगदूम कुटुंबियनी भंग केला आहे.
25 कोटींची जागा हडपण्यासाठी मगदूम कुटुंबीयांची ही धडपड जनतेसमोर आली असून सर्वच वर्गातून या गलिच्छ प्रकाराबद्दल छी थू होत आहे. शासनाने मोदी ट्रस्टला दिलेल्या जागेच्या वापराबाबतच्या अटी आणि शर्तींचा भंग झाला आहे. त्यामुळे आता ही जागा शासन कशाप्रकारे ताब्यात घेणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत.