येथील श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक गणपतराव पाटील यांनी 54 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ करून यंदा गाळपास येणाऱ्या उसाला एफआरपी प्रमाणे 3,400 रु. आणि हंगाम संपल्यावर रिकव्हरी बघून जे काय देता येईल ते देखिल देणार असल्याचे जाहीर केले.
दराची घोषणा केल्यानंतर लागलीच शेती विभागाने ऊस तोडी दिल्या. परंतु, शेतात घात नाही आणि शेतकरी संघटनांच्या मागणीप्रमाणे निर्णय झाला नाही त्यामुळे काही शेतकऱ्यांनी ऊस तोडी नाकारल्याचे समजते.
दरम्यान, मा.खा. व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेच्या माध्यमातून केलेल्या किमान, ऊस दराच्या मागणीच्या जवळपास सुध्दा दत्त कडून पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे दत्त साखर कारखान्याने जाहीर केलेला ऊस दर शेतकऱ्यांना मान्य आहे की, नाही ? शेतकरी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेणार ? हे नजीकच्या काळात समजणार आहे.
आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी मागील हंगामातील फायदा कुठे गेला तो पहिला द्या आणि चालूला किमान 4,000 रुपये मिळाले पाहिजेत. अशी एल्गार ऊस परिषदेच्या माध्यमातून मागणी करून, शेतकऱ्यांनी उसतोडी घेऊ नयेत असे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.
कारखान्याचे संचालक गणपतराव पाटील यांना निर्भीड आणि सत्य मांडणी करणाऱ्या दैनिक, वेबपोर्टल, युट्यूब व सोशल मिडीया इमेजची भीती वाटते ? त्यामुळे त्यांनी ठराविक माध्यमांना शुभारंभासाठी निमंत्रित केल्याचे समजते.ज्या माध्यमांनी निवडणुकीत आणि जाहिरातीच्या माध्यमातून दत्त साखरची लाखोंने लुटमार सुरु ठेवली आहे. त्यांनाच संचालक पाटील यांनी मानाचे स्थान दिल्याचे चर्चेत आहे.
यंदाच्या हंगामात उसाचे उत्पादन कमी होणार असल्यामुळे साखर कारखाने जास्त दिवस चालतील अशी परिस्थिती नाही. वर्षापूर्वी दत्त साखर कारखाने विस्तारीकरण केले हे विस्तारीकरण फसल्याचे जाहीरपणे सभासद शेतकरी बोलत आहेत. यंदा विस्तारीकरणाप्रमाणे गाळप करण्याचे आव्हान दत्त समोर असणार आहे.
विस्तारीकरणाची गरज नसताना कारखान्यावर कोट्यावधी रुपयांचे कर्ज काढून कमीत कमी खर्चात विस्तारीकरण करून, उरलेल्या कर्जात कमी-जादा वाटे घालून पोटावरून हात फिरवल्याचा आरोप आजही स्पष्टपणे केला जातोय. तसेच जांभळी येथील दत्त सोयाबीन प्रकल्पाच्या भ्रष्टाचार प्रकरणाने सुध्दा डोके वर काढल्याचे समजून येत आहे.
कारखान्याचे संचालक गणपतराव पाटील, गेल्या वर्षी 60 रुपये हंगाम संपल्यावर जादा दिले असे सांगून खोटे बोलत आहेत. त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा ? असा सवाल ही चुडमुंगे यांनी केला आहे.