त्याचाही ऊहापोह त्याच सार्वजनिक कार्यक्रमाच्या व्यासपीठावर व्हायला हवा. ‘पेड न्यूज’ चे जनक हा पुरस्कार ऐनवेळी बहाल व्हावा.
कोल्हापूर : दसरा चौक
श्रीमंत व्यक्तीचा कोणताही कार्यक्रम असो. तो ठरलेला, पूर्वनियोजित असतो. कर्मचाऱ्यांना माणसे आणायला लाऊन गर्दी दाखवायची आणि राज्याचे कोणीही प्रमुख असो (जसे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, विरोधी पक्ष नेते), त्यांना असे दाखवायचे की लोक आपल्यावर किती प्रेम करतात. आता अशा पूर्वनियोजित कार्यक्रमात त्या अती श्रीमंत व्यक्तीचे खरेखुरे व्यक्तिमत्व काय होते आणि आहे, हे उघडपणे बोलणारा प्र. के. अत्रे यांच्या सारखा धुरंदर, विकृतीवर आसूड ओढणारा एकही नेता महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय जीवनात नसावा, याची खंत आहे.
महाराष्ट्राला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्र. के. अत्रे, नानासाहेब परुळेकर अशी महान संपादकांची परंपरा आहे. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी, समाजाच्या उद्धारासाठी आपली लेखणी तलवारीप्रमाणे चालवली.
पण स्वातंत्र्यानंतर काळ बदलला. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा, अशी लोकशाहीची थट्टा, विटंबना सुरू झाली. निवडणुकीत भरमसाठ पैसा ओतायचा आणि सत्तेत येऊन त्याची कैक पटीने भरपाई करायची, अशी विकृती लोकशाहीला घातक ठरत आहे.
अशा काळात समाजात समाजातील, निवडणुकीतील विकृतीवर आसूड ओढणारे संपादक नावाला सुध्दा उरले नाहीत. त्यांनीही भ्रष्ट व्यवस्थेत हात धुवून घेण्याचा, स्वतःच्या कुटुंबाची संपत्ती गगनाला कशी भिडेल असाच फंडा अवलंबला. एका संपादकाने तर, उमेदवार पाच वर्षे पैसे मिळवतात, त्याच्या बातम्या फुकट छापायच्या नाहीत, अशी भूमिका घेतली. यातून त्याने पेड न्यूज ची किड पत्रकारितेला लावली.
पण कोणीही व्यक्ती असो. त्याचे कर्म त्याला सोडत नाही. कोणाही संपादकाने पेड न्यूज च्या माध्यमातून लोकशाहीला लागलेला कलंक पुसला असता, खोऱ्याने पैसा ओढला नसता तर त्याचा आज पेड न्यूजची प्रथा मोडून काढणारा, त्यावर प्रहार करणारा संपादक अशी बिरुदावली त्याला मिरवता आली नसती. पण संपादकांनी स्वतःची घरे भरण्याचे पाप केल्याने, पेड न्यूजचे जनक म्हणून स्वतःचा गौरव करून घ्यावा. खोटे चरित्र मांडून उदो उदो करून घेऊ नये.
जेव्हा एखादी व्यक्ती, अतिशय चांगले कार्य केले म्हणून सत्कार स्वीकारते, स्वतःचा सत्कार, स्वतःच पैसे घालून मोठमोठ्या व्यक्तीकडून करून घेते. त्याचवेळी त्या व्यक्तीने समाजासाठी काय केले ? याचाही ऊहापोह त्याच सार्वजनिक कार्यक्रमात झाला पाहिजे. कारण पेड हा प्रकार साक्षात दरोडा नाही का ? समोरील व्यक्तीची कमजोरी हेरून, त्याला मदत करण्याचे अमिष दाखवून लूटण्याचा हा परफेक्ट कार्यक्रम नाही का ?
महाराष्ट्रात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, राज्यपाल, विरोधी पक्ष नेते असे सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी जेव्हा व्यासपीठावर एकत्र येतात, तेव्हा त्यांनी लोकांसमोर प्रामाणिकपणे बोलण्याची भूमिका घेतली पाहिजे. नाहीतर सत्कारमूर्तीला शब्द गोड वाटावेत म्हणून त्याचे गुणगान गाणारे भाषण आजच्या समाजाला नको आहे. राजकारण्यांच्या अशा दुतोंडीपणामुळे महाराष्ट्रातील गौरवशाली पत्रकारितेचे सोनेरी दिवस कधीही परत येणार नाहीत.