पुढारी, अधिकारी पैसे खातात; त्यांना ’टार्गेट’ करणारे महान व्यक्तिमत्व
कोल्हापूर: दसरा चौकातून..
वृत्तपत्राचा वर्धापन दिन म्हटला की राजकीय पुढारी, शासकीय अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी यांच्या अंगावर काटा येतो. कारण त्यांना भ्रष्टाचारी असे बिरूद लावणारे एक महान व्यक्तिमत्व कोल्हापूर जिल्ह्यात आहे. वर्षभर ते पैसे खातात, त्यांना टार्गेट करा, त्यांच्याकडून वर्धापन दिनाची शुभेच्छा जाहिरात घ्या, अशी वार्ताहरांना बळजबरी करून हे महान व्यक्तिमत्व अती अती श्रीमंत झाले आहे. अशा श्रीमंत, मर्सिडिजमधून फिरणाऱ्या, शेकडो एकर जमिनींचा मालक झालेल्या व्यक्तिमत्वाला ‘वर्धापन दिनाचे संकल्पक’ या पुरस्काराचीही जोड द्यायला हवी.
जगात असा कोणताही उद्योग नाही की त्या उद्योगाच्या वर्धापन दिनानिमित्ताने शुभेच्छा देणाऱ्यांकडून पैसे गोळा केले जातात. पण ही किमया वृत्तपत्र उद्योगात घडवण्याचे कार्य कोल्हापूरच्या मातीत जन्मलेल्या एका महान व्यक्तिमत्त्वाने करून दाखवली आहे.
वृत्तपत्राच्या वर्धापन दिनासाठी वार्ताहरांना दरवर्षी काही कोटी रुपयांचे टारगेट देण्याची म्हणजे पैसे गोळा करण्याची जबाबदारी देण्याची कुप्रथा या व्यक्तिमत्त्वाने वृत्तपत्र व्यवसायात रुजवली. वार्ताहराने काय करायचे याचे प्रशिक्षण, मार्गदर्शन हे महान व्यक्तिमत्व दरवर्षी वार्षिक बैठक घेऊन देते. वार्ताहरांशी संवाद या नावाखाली पैसे कसे गोळा करायचे हे वार्ताहरांच्या मनावर ठसविले जाते.
आता यामध्ये या महान व्यक्तिमत्त्वाची विचारधारा काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे. अधिकारी, कर्मचारी स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी वर्षभर पैसे खातात. रस्ता, सांस्कृतिक भवन, शासकीय इमारत अशा विकासकामांच्या उद्घाटनाच्या बातम्या तुम्ही प्रसिद्ध करून घेता. त्यांची तुम्ही फुकट प्रसिद्धी करता. पण अशी कामे निकृष्ट होतात. त्याच्या बातम्या तुम्ही द्या. त्या नको असतील तर त्यांच्याकडून जाहिरात घ्या, असा हा भ्रष्टाचार करावयास शिकवणारा कानमंत्र हे महान व्यक्तिमत्व देते.
समाजातीतील चुकीच्या गोष्टीवर प्रहार करणे, ही लोकशाहीचा चौथा स्तंभ अशी ओळख असलेल्या वृत्तपत्र क्षेत्राची जबाबदारी. पण वाहत्या गंगेत हात कसे धुऊन घ्यायचे हे शिकवणारा, त्यातून पैसे मिळवण्याची कधीही न संपणारी लालसा जपणारा माणूस म्हणून त्याचा गौरव व्हायला हवा; पण तो होत नाही हे दुर्दैव म्हणायचे.
वार्ताहर कोणत्या गावात काम करतो, गाव किती मोठे आहे, यावर त्याचे टार्गेट ठरवले जाते. भागात साखर कारखाना, पंचायत समिती कार्यालय, नगरपरिषद, पोलीस स्टेशन असेल तर टार्गेट काही लाख रुपयांचे असते तर साधी ग्रामपंचायत, विकास सोसायटी असेल तर टार्गेट लाख रुपये पर्यंत असते. मंत्रालय पातळीवर तर काही कोटी रुपयांचे टार्गेट दिले जाते.
याशिवाय वर्षभर कोणत्या ना कोणत्या दिनाचे जसे की डॉक्टर डे, वुमन्स डे, अभियंता दिन इत्यादीचे औचित्य साधून त्यांनाही बकरा करण्याचा फंडा या महाशयानेच राबवला. कोणा मोठ्या व्यक्तीचे निधन झाले तरी त्याची पुरवणी प्रसिद्ध करून जाहिराती गोळा करण्याचा प्रताप कोल्हापूरच्या मातीतून रुजविण्याचे पाप याच व्यक्तिमत्त्वाचे!
आता असा माणूस जेव्हा आत्मवृत्त लिहितो, तेव्हा त्याने किमान आत्म्याशी प्रतारणा करू नये, असे वाटते. पण त्याने ती केली आहे. त्याच्या मनोवृत्तीचे खरे प्रतिबिंब त्यात उमटले नसेल तर असे पुस्तक उकिरड्यात टाकण्याच्या पात्रतेचे असते. समाजाला या गोष्टी पटत नाहीत. आणि समाज तसे करतो, हे लवकरच कळेल. असा जीवन प्रवास वाचून कोणालाही प्रेरणा मिळणार नाही. अशा वाटेवरून चांगली माणसे कधीही जात नाहीत. आपल्या घरात हरामाचा पैसा नको, अशी त्याची मानसिकता असते.
आयुष्याच्या एका वळणावर माणूस जेव्हा मागे वळून पाहतो, तेव्हा काय बरोबर आणि काय चूक हे त्याला स्वतःला कळते. पण चुकीचे केले ते मान्य न करणे, किंबहुना ते बरोबरच होते असे समजून त्याला चिटकून राहणे अशी त्याची मानसिकता आहे. आता स्वतःची प्रेस आहे म्हणून समाजापुढे खोटे मांडून मला चांगले म्हणावे अशी अपेक्षा धरणे म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात राहणे होय. लोकांची दिशाभूल करून, स्वतःचा उदो उदो केल्याने असे पाप जनमानसाच्या मनातून पुसले जात नाही.
चांगली आणि वाईट अशा दोन्ही बाजू आत्मवृत्तात असायला पाहिजेत. महात्मा गांधी यांनी, ते स्वतः कुंटणखान्यात गेलेला प्रसंग मांडला आहे. त्यामुळे ते महात्मा झाले. पण खोटे छापून कोणी महात्मा होत नाही.