editor_khamkya@outlook.com November 7, 2025

आम.अशोकराव माने यांना ताराराणी हाच पर्याय, भाजपाशी संसार अन्, “कमळ”शी “तलाक”
शिरोळ : शरद काळे
भाजपा आणि अपक्ष आम. राजेंद्र पाटील यड्रावकर ( शिंदे शिवसेना ), राजर्षी शाहू विकास आघाडी यांच्यात यांच्यात शुक्रवारी “घटस्फोट” झाल्याची चर्चा शिरोळ तालुक्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तत्पूर्वी, कोल्हापूर येथे खास.मुन्ना महाडिक, संजय पाटील यड्रावकर आणि महादेवराव घाटगे यांच्या बैठकीत, ठरलेला 11/10 असा फॉर्मुला आम. यड्रावकरांनी अमान्य करीत भाजपा, जनसुराज्यला, राजर्षी शाहू आघाडीचे अस्तित्व दाखवून दिल्याची चर्चा रंगली आहे.
घटस्फोटाच्या गदारोळात भाजपाशी संसार केलेल्या आम. अशोकराव माने यांनी कमळ चिन्हाला “तलाक” देत, ताराराणी आघाडीचे राजकीय “मंगळसूत्र” घालण्याला पसंती दिली अन् “तीन” कोटी “पन्नास” लाख रुपये वाचवले. पैसा आणि अति (प्रचंड) आत्मविश्वास या दोन बाबींनी, आम. माने यांचे मनसुबे उधळून लावत प्रतिष्ठा पणाला लावण्याचा सल्ला दिल्याचे मतदार बोलत आहेत. घटस्फोट ,तलाक या दोन घटनेमुळे “फिक्स” आणि “रिस्क” च्या घडामोडी संपुष्टात येऊन केवळ “आब” कसा राखता येईल, यावर “कॉन्सन्ट्रेशन” करणे आवश्यक असल्याची चर्चा आहे.
महात्मा “गांधी”जींच्या विचारांची प्रेरणा घेवून वाटचाल करणारे आम. अशोकराव माने “बापू” यांच्या धरसोड हालचाली बद्दल उलटसुलट चर्चा होती. पण, शुक्रवारी ही चर्चा कुलूप बंद झाली. सहकारात विना भ्रष्टाचारी व पारदर्शी कारभार करणारे म्हणून ज्यांची ओळख आहे. असे आम.अशोकराव बापू हे महायुतीतील जनसुराज्य पक्षाचे आमदार आहेत. परंतू, जनसुराज्याची नगण्य ताकद, मतदार, नागरिक ,सामान्य वर्ग व स्व समुदायाचा पाठिंबा नाही, या कारणास्तव ते स्वतःला सिध्द करू शकत नसल्याची चर्चा आहे.
जयसिंगपूरच्या गत निवडणुकीत भाजपाने नगराध्यक्ष पदावरून यड्रावकरांना सलग पाच वर्षे दिलेला दुय्यम दर्जा. आमदार अशोकराव माने यांची दररोज नगरपरिषदेमध्ये होणारी उठबस त्यामुळे यड्रावकरांनी आम.अशोक माने यांना सहानुभूती दाखवण्याचा प्रश्न निर्माण होत नसल्याचे मतदार बोलत आहेत.याशिवाय शिरोळ नगरपरिषदेच्या राजकारणात पुत्र डॉ. अरविंद माने यांनी अडीच वर्षानंतर केलेली “पॉलिटिक्स”, विरोधकांशी हातमिळवणी, यावरून मतदार, नागरिकात निर्माण झालेली निराशा, तिरस्कार आता उफाळून येणार असल्याची चर्चा आहे.


