नगरपरिषद निवडणुकीसाठी तालुक्यातील सर्व पक्ष, गट-तट, संघटना एकत्र येणार !
शिरोळ/जयसिंगपूर/कुरुंदवाड : खमक्या वृत्तसेवा
जयसिंगपूर आणि कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुक पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडी (काँग्रेस, राष्ट्रवादी (श.प.गट ) आणि शिवसेना (उबाठा), स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजपा पुरस्कृत (ताराराणी आघाडी), आम आदमी पार्टी यासह आंबेडकरी संघटना व पक्ष एकत्रित येऊन निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची अधिकृत माहिती समजून आली आहे.
मा.मंत्री व आम.डॉ.राजेंद्र व संजय पाटील यड्रावकर यांची तालुक्यातील तीनही नगरपरिषदेमध्ये होणारी घुसखोरी, हुकूमशाही त्याचबरोबर अति पैशाचा वापर करून फोडाफोडीचे राजकारण करणे, मतदारांना आर्थिक दबाव खाली आणून लाचार करणे, लोकशाहीची पायमल्ली करणे, निधीच्या नावाखाली “टक्केवारी”चे राजकारण करून निकृष्ट दर्जाची कामे करणे, अशा गैर नितीला ठेचण्यासाठी तालुक्यातील सगळ्या पक्ष, संघटना, गट-तटांनी मोट बांधल्याचे वृत्त समजून येत आहे.
सोमवारी जयसिंगपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन एकजुटीचा अध्याय लिहिला जाऊन, विरोधाचा नारळ वाढवला जाणार आहे.कुरुंदवाड, शिरोळ येथील नगरपरिषद निवडणुकीत उमेदवार पळवापळवी व फोडाफोडी, प्रमुख व पदाधिकारी यांना अभ्रद वागणुक यामुळे राग आनावर झालेल्या भाजपाने वचपा काढण्यासाठी पुढाकार घेतल्याचे चर्चेत आहे.
एका “टग्या”च्या माध्यमातून रसद पुरवून काही कारखान्याला टार्गेट करण्यासाठी, पाठीशी बळ उभा करणे, स्वाभिमानीला बदनाम करणे, असे खुनशी राजकारण केले जात असल्याच्या समज-गैरसमजातून शेट्टी आणि कारखानदारांची, तळ पायाची आग मस्तकाला गेल्याचे समजते. त्यामुळे निवडणुकीच्या माध्यमातून कायमचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने रणशिंग फुंकले जाणार असल्याची चर्चा आहे.