कोट्यावधी आले कुठून?, चौकशी करावी. “संजय” कडून वृतांत घेतला जाणार !
जयसिंगपूर/सांगली-अंकली : खमक्या वृत्तसेवा
नगरपरिषदेमध्ये जीव अडकलेल्या “त्या” पोपटाला (शहाजहां) कॉन्ट्रॅक्टरांनी दिलेल्या टक्केवारीतून सांगली-अंकली रोडवर पुर्व दिशेला सुरू असलेले बांधकाम (ताजमहल) “एक कोटी”चे नसून तब्बल “सव्वादोन कोटी”चे आहे. हे बांधकाम (ताजमहल) “मूर्ती लहान पण, कीर्ती महान” असणाऱ्या एका अधिकाऱ्यासाठी “पोपटा”कडून करण्यात येत असल्याची खळबळ जनक माहिती पुढे आली आहे.
पोपटाचा (शहाजहां) जीव अडकलेल्याची (पिना मुमताज) याच बंगल्यात (ताजमहल) आयुष्यभर जोपासना केली जाणार आहे. या ठिकाणी गुंतवले जाणारे कोट्यावधी, कंत्राटदारांच्या टक्केवारीतील असले तरी एवढी माया “खवळी” वृत्तीकडे आली कुठून ? त्यांनी कोण कोणत्या कामात ढपला पाडला आहे, याची खोलवर चौकशी करून कारवाई होण्यासाठी “खमक्या”ने पुढाकार घेवून पाठपुरावा करावा अशी मागणी शहरातील शेकडो नागरिकांनी वेगवेगळ्या माध्यमातून केली आहे.
डोळे दिपणारे, दिव्य असे बांधकाम (ताजमहल) पाहिले तर, प्रत्येकाला “नारायण”-“नारायण” आठवल्याशिवाय राहणार नाही. खरं तर ही “नारायण” देवाची कृपाच म्हणावी लागेल, आधुनिक नारायण देवाला सिंधीचा नैवेद्य आवडत असता तरी, त्यांच्या गळ्याभोवती निर्माण होणारा वर्तुळाकार फास सोडवण्यासाठी कोण पुढे येणार ? याकडे आत्तापासूनच शहरवासीयांच्या नजरा लागून राहिल्याचे समजते.
कोट्यावधीच्या बांधकामाची (ताजमहल) शहरात चर्चा सुरू झाल्याने, पोपटाच्या डोळ्याला अंधारी जाणवू लागली आहे. उपचार म्हणून पोपटाने महाभारतातील “संजय”ला आमंत्रित करून, बसल्या ठिकाणी ताजमहल बांधकाम व घटनेचा वृत्तांत घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजून येत आहे. त्याचबरोबर हा जिव्हाळा हिर-रांजा, लैला-मजनू, शहाजहां-मुमताज, प्रतापसिंह-शशिकला, नल-दमयंती, बाजीराव-मस्तानी यांच्यापेक्षा श्रेष्ठ असल्याची चर्चा सुरू आहे.