फॉरेन्सिक रिपोर्ट? प्रतिज्ञापत्र दाखल करा, संशयितांना मदत झाली आहे? यासह अन्य काही पाहूनच नंतर ठरवेन
कोल्हापूर/शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
अनेक लोकांची फसवणूक झाली आहे, त्याचा तपास योग्य होत नाही, अशावेळी पोलिस अधीक्षक म्हणून आपली काही जबाबदारी आहे की नाही. तुम्ही आणि तपास अधिकाऱ्यांनी काय तपास केला, याचे वैयक्तिक प्रतिज्ञापत्र सादर करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांनी तत्कालीन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांना दिले.
ग्रोबझ ट्रेडिंग सर्व्हिसेस फसवणूकप्रकरणी मुख्य संशयित विश्वास कोळी याच्या जामीन अर्जावर सर्किट बेंचमध्ये सुनावणी झाली. गेल्या सुनावणीत न्यायमूर्ती दिगे यांनी पंडित यांना न्यायालयात प्रत्यक्षात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज पंडित प्रत्यक्ष हजर होते. यावेळी न्यायालयात अनेकांची फसवणूक झाली असतानाही आपण काय केले, असा सवाल न्यायमूर्तीनी केला.
यावेळी तपासात काही त्रुटी राहिल्या आहेत. त्या दुरुस्त करण्यासाठी वेळ मिळावा, अशी विनंती पंडित यांनी केली. सुरुवातीचे चार्जशीट तत्कालीन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिले असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आले. यानंतर फिर्यादीचे वकील जयंत बारदेस्कर यांनीही त्यांची बाजू मांडली.
यानंतर न्यायमूर्ती यांनी अधीक्षक पंडित यांना पोलिस अधीक्षकांची कर्तव्ये काय काय आहेत, असे विचारले. याची माहिती त्यांनी दिली. यावर न्यायमूर्ती दिगे यांनी साधारण 26 हजार 382 गुंतवणूकदार असल्याची माहिती तुम्हाला मिळाली. त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचला काय, पोहोचण्यासाठी वृत्तपत्रामधून आवाहन केले आहे काय, अशी विचारणा केली.
एमपीआयडीचा प्रस्ताव तयार केला आहे काय ? ही कारवाई केव्हा सुरू केली. खोटे बोललात, तर तुम्हीच अडचणीत याल. व्यवस्थित माहिती पाहिजे. काय जप्त केले? कायदा कशासाठी केला आहे? गुंतवणूकदारांच्या हितासाठी केला असेल की नाही. एक वर्षाने एमपीआयडीचा प्रस्ताव दाखल केला.
संशयितांची मालमत्ता माहिती होण्यासाठी एक वर्ष लागले ? फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टचे काय झाले? तुम्हाला काय म्हणायचे आहे ते प्रत्येक तपास अधिकाऱ्यांनी स्वतंत्र प्रतिज्ञापत्र दाखल करा. प्रथमदर्शीनी अनेक चुका असल्याचे दिसते. यातून संशयितांना मदत झाली आहे काय, यासह अन्य काही मी तुमचे प्रतिज्ञापत्र पाहून नंतर ठरवेन’, असेही न्यायमूर्ती दिगे यांनी स्पष्ट केले.
पुढील सुनावणी 19 डिसेंबरला नेमण्यात आली आहे. यावेळी फिर्यादीचे वकील जयंत बारदेस्कर ऑनलाईन, तर अॅड. अहिल्या नलवडे, अॅड. चेतन अलाय, सरकारी वकील श्रीराम चौधरी, अॅड. प्रियांका राणे-पाटील आणि अॅड. आनंद शाळगावकर यांच्यासह संशयितांचे वकील, मुख्य फिर्यादी रघुनाथ खोडके उपस्थित होते.