अमृत पाणी योजनेच्या तुलनेत 97 कोटी रुपयांची भुयारी गटार अधिक महत्त्वाची
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
शिरोळ शहराला श्रीनगर वसाहती पासून पंचगंगा नदीवेस पर्यंत पूर्व-पश्चिम, दक्षिण- उत्तर असा नैसर्गिक ढाळ आहे. सांडपाणी योग्यरीत्या निचरा होत आहे. नगरपरिषद व ठेकेदाराने शहरात आरोग्याची कामे चोखपणे पार पडल्यास कोणत्याही रोगराईचा प्रश्न उद्भवत नाही. सध्या, शहरात भुयारी गटारीचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. परंतु, हीच योजना जयसिंगपूर शहरात कितपत यशस्वी झाली आहे, याचा सारासार विचार करून शिरोळकरांनी भुयारी गटार अयोग्य? हे ठरवण्याची गरज असल्याची चर्चा सुरू असल्याचे समजते.
वास्तविक पाहता, भुयारी गटारीच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांचा खर्च उत्पन्नाच्या तुलनेत जादा (उदा. विज बिल व इतर खर्च) असल्याने इतर शहरातील नगरपरिषदांनी आपले प्रक्रिया प्रकल्प बंद ठेवले आहेत. शिरोळ नगरपरिषदेला तर सांडपाणी प्रकल्प चालवणे शक्यच नसल्याचे लोक बोलत आहेत. मुळात सांडपाणी प्रकल्प, महापूर आणि लाल पट्ट्यात असल्यामुळे त्याचे बांधकाम होणे अशक्य वाटते, तरीसुद्धा भुयारी गटारीचे काम कशाकरीता? असा एकच प्रश्न शिरोळकरांना पडल्याचे समजून येत आहे.
खरंतर, भुयारी गटारीची मागणी कधीच केली नसल्याचे शहरवासीय सांगताहेत. तरीदेखील सुरू करण्यात आलेले भुयारी गटारीचे काम विकासाच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या सोईसाठी होत आहे का? असे विविध सवाल शहरवासीयातून केले जात असल्याचे समजते. तसे पाहिले तर, अमृत पाणी योजना निधीच्या तुलनेत भुयारी गटारीचा 97 कोटी रुपयांचा निधी कितीतरी पटीने जादा असल्यामुळे भुयारी गटारीला प्राधान्य दिले जात असल्याचे चर्चेत आहे.
जयसिंगपूर शहरात भूमिगत गटारीचे करण्यात आलेल्या कामामुळे रस्त्यांची धूळधाण झाली आहे, शहरातून योग्य पद्धतीने पाणी निचरा होत नाही. आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे सुद्धा बांधकाम नाही, असे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे शिरोळला फक्त भूमिगत गटारीचे जाळे निर्माण केले जाईल?, भुयारी गटारीचा कर आकारला जाईल? पण, पाणी निचरा होईल की, नाही याची शंभर टक्के खात्री नाही?, परिनामी सांडपाणी प्रकल्पाचे बांधकाम लोंबकळणार? पुढे ते होईल की, नाही? याची खात्री नाही, त्यामुळे निधीचे काय होणार? कसे होणार? याचा मार्ग आगोदरच निश्चित केल्यामुळे शहरवासीयांना चिंता करण्याचे कारण नसल्याचे नागरिक बोलताहेत.
पाणी योजनेपेक्षा, भुयारी गटर महत्वाची?
शहराला भुयारी गटारीची योजना नको अशा अनेक तक्रारी करण्यात झाल्या. परंतु, विरोधी गटाकडून या तक्रारीकडे डोळे झाक करण्यात आली? शहरात आंदोलन सुरू असताना प्र.मुख्याधिकारी नरळे यांनी वर्क ऑर्डर दिली. पाणी योजनेला स्वनिधी दिला नाही. पण, भुयारी गटारीला दिला? पुराचे पाणी पाईप लाईन मध्ये शिरल्यानंतर ते शहरात कुठेही उन्मळण्याचा मोठा धोका, वास्तविक, या प्रकाराचा जाब का विचारला नाही? असा सवाल करुन, नगरपरिषदेमध्ये नव्याने सत्ता स्थापन होई पर्यंत भुयारी गटारीचे काम स्थगित करावे, अशी मागणी शहरवासियांतून होत आहे.