लक्ष्मीपुरी पोलिसांच्या अहवालात दोन पावत्यांवर शिक्कामोर्तब
कोल्हापूर : खमक्या वृत्तसेवा
एकाच जाहिरात बिलाच्या दोन व्हाउचर प्रती न्यायालयातील दोषारोपत्रात दाखल झाल्याने, शासकीय दस्तऐवजात खाडाखोड केल्याची फिर्याद, “खमक्या”चे संपादक शरद काळे यांनी कोल्हापूर येथील न्यायालयात केली आहे. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांना अहवाल देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्याप्रमाणे लक्ष्मीपूरी पोलिसांनी दि. 16 डिसेंबर रोजी अहवाल सादर केला. त्यात एकाच बिलाचे दोन व्हाउचर असल्याचा स्पष्ट अभिप्राय नोंदवला आहे. पण, त्यातील खरे व बनावट व्हाउचर कोणते याचा निष्कर्ष मात्र पोलिसांना काढता आला नाही, की ते अद्याप दबावाखाली काम करीत आहेत, हे मात्र समजून येत नाही.
दोषारोपपत्रात तहसील कार्यालयाच्या जाहिरात बिलाचे एकच वाउचर जोडणे अपेक्षित होते. पण सत्य लपवावे लागत नाही, ते सहजपणे उघड होते, याचा प्रत्यय या प्रकरणात आला आहे. शरद काळे यांच्यावर खोटा गुन्हा नोंद करण्यासाठी कुभांड रचण्यात आले. प्रत्यक्षात पुढारीचे वसूली प्रतिनिधी सागर भूपाल कोळी (रा.कुटवाड ) यांची व्हाउचरवर सही असताना, वसुली प्रतिनिधीने शरद काळे यांना पैसे दिले, असा “वाई मार्गे सातारा” प्रवास दाखवणारा खोटा मजकूर व्हाउचरवर लिहिण्यात आला आहे. मूळ व्हाउचरवर सागर कोळी यांची सही असून ती सही बनावट व्हाउचरमध्ये बदलण्यात आली आहे.
पोलिसांनी सादर केलेल्या अहवालात दोन व्हाउचर आहेत, असा अभिप्राय नोंदवला आहे. तसेच एका व्हाउचरवर तहसीलदार यांची सही नाही, असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. परंतु, दोषारोप पत्रातील मूळ व्हाउचर कोणते? खाडाखोड केलेले व्हाउचर कोणते? ही खाडाखोड कोणी केली? ती कोणत्या संगणकावर केली? त्यामागे काय उद्देश होता? हे बनावट व्हाउचर पोलिस दप्तरी कोणी सादर केले? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या अहवालातून मिळालेली नाहीत.
मुळातच शरद काळे यांची तक्रार बनावट व्हाउचर प्रकरणी आहे. त्यामुळे खरे व्हाउचर आणि खोटे व्हाऊचर या संदर्भात स्पष्ट अभिप्राय प्राप्त होणे आवश्यक होते. परंतु, अपहार प्रकरणाचा तपास चार ते पाच अधिकाऱ्यांनी हाताळलेला आहे, असा आधार घेत सखोल चौकशीला लक्ष्मीपुरी पोलिसांनी बगल दिली आहे.
आता या गुन्ह्याचा तपास ज्या अधिकाऱ्यांनी केला, तेच अधिकारी या बनावट व्हाउचर प्रकरणी खुलासा करू शकतात. कोणत्या अधिकाऱ्याकडे बनावट व्हाउचर देण्यात आले, या प्रश्नाचे उत्तर या गुन्ह्यातील तपास अधिकारी देऊ शकतात. परंतु, तपास अधिकाऱ्यांकडे चौकशी करण्याचे कष्ट विद्यमान तपास अधिकारी व्ही.एन. जाधव यांनी घेतलेले नाहीत. त्यामुळे चौकशी अहवाल मोघम देऊन गुन्हा दाखल करताना केलेल्या चुका झाकण्याचा प्रयत्न नव्याने झाला आहे.
बनावट व्हाउचर प्रकरणात पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव, व्यवस्थापकीय संपादक योगेश जाधव, ग्रुप जनरल मॅनेजर अनिल पाटील, अकाउंट मॅनेजर शिवाप्पा कुंभार, ग्रामीण जाहिरात मॅनेजर जाहीदहुसेन शेख आणि वसुली प्रतिनिधी सागर कोळी हे संशयित आरोपी आहेत. बनावट व्हाउचर नेमके कोणी केले? कोणाच्या सांगण्यावरून केले? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गुन्ह्याचा तपास करण्याची जबाबदारी ज्यांच्यावरती असते, त्यांनाच फसवण्याचा प्रकार घडला आहे. ती फसवणूक कोणी केली हे पोलिसांना सांगता येऊ नये हे पोलीस खात्याचे अपयश म्हणायचे की, बड्या धेडांना पाठीशी घालण्याचा प्रकार म्हणायचा, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.