शरद काळे यांची फिर्यादी कुंभार याच्यासह साथीदारांविरोधात न्यायालयात तक्रार
खमक्या : अक्षय पाटील (कोल्हापूर)
“खमक्या” न्यूज पोर्टलचे संपादक शरद काळे यांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रात शिरोळ तहसील कार्यालयाचे एक मूळ व एक बनावट असे दोन व्हाउचर आहेत. बनावट व्हाउचर प्रकरणी शरद काळे यांनी फिर्यादी शिवाप्पा हनमंत कुंभार व त्याच्या साथीदारांविरोधात कोल्हापूर न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी शरद काळे यांचे वकिल इंद्रजीत कांबळे यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने लक्ष्मीपुरी पोलिसांना बनावट व्हाउचरबाबत स्पष्ट अभिप्राय देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे दि. 16 डिसेंबर रोजी लक्ष्मीपूरी पोलिस न्यायालयात कोणता अभिप्राय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शरद काळे हे दैनिक पुढारीमध्ये कार्यरत असताना त्यांच्यावर जाहिराती गोळा करण्याची सक्ती पुढारी व्यवस्थापनाने केली. आतापर्यंत त्यांनी सर्वच पत्रकारांना आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतवले आहे. पुढे त्याचा कसा गैरवापर होतो, हे शरद काळे यांच्या प्रकरणावरून सिद्ध झाले आहे. वास्तविक मार्केटमधून जाहिरातरुपी पैसे गोळा करणे, हे वार्ताहराचे काम नाही. बातमी संकलन करणे हे वार्ताहरचे काम असते.
शरद काळे यांच्या विरोधात पुढारी व्यवस्थापनाने अपहाराचा खोटा गुन्हा नोंद केला. शरद काळे यांना अटक व्हावी, यासाठी पोलीस यंत्रणेचा ससेमिरा लावला. पण उच्च न्यायालयाने शरद काळे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यामुळे बडया धेंडाचे मनसुबे उधळले गेले या गुन्ह्यात लक्ष्मीपुरी पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे.
दोषारोपपत्र पाहिल्यानंतर त्यामध्ये तहसील कार्यालयाचे बनावट व्हाउचर जोडल्याचे आढळून आले. याप्रकरणी शरद काळे यांनी सर्व स्तरावर खातरजमा केली. तेव्हा शिरोळ तहसील कार्यालयाकडे जो दस्तावेज उपलब्ध आहे, तोच दस्तावेज जारी केल्याचे तहसील कार्यालयाने म्हटले आहे. जो बनावट दस्तावेज आहे, त्याच्याशी तहसील कार्यालयाचा काहीही संबंध नाही, असा खुलासा केल्याने बनावट व्हाउचर प्रकरणाचे गुढ आणखीन वाढले आहे.
सदरचे बनावट व्हाउचर कोणी तयार केले, याची चौकशी होऊन, बनावट शासकीय दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी संबधितावर गुन्हे दाखल करावेत, अशी खाजगी फिर्याद शरद काळे यांनी कोल्हापूर न्यायालयात दिली आहे. हा फौजदारी दावा माननीय न्यायाधीश पी.बी.रजपूतसो यांच्यापुढे सुरू आहे. या दाव्यात शरद काळे यांनी दैनिक पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव, व्यवस्थापकीय संपादक योगेश जाधव, व्यवस्थापक अनिल पाटील, फिर्यादी शिवाप्पा कुंभार, ग्रामीण जाहिरात व्यवस्थापक जाहिदहुसेन शेख व प्रत्यक्षात अधिकृत व्हाउचरवर ज्याची सही आहे आणि ज्याने पैसे स्वीकारले तो जाहिरात वसुली प्रतिनिधी सागर कोळी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. शरद काळे यांना बनावट गुन्ह्यात अडकवण्यासाठी सर्व संशयितांनी संगनमताने बनावट दस्तऐवज तयार केल्याचे खाजगी फिर्यादीत म्हटले आहे.
या दाव्यात प्रसिद्ध फौजदारी वकील इंद्रजीत कांबळे यांनी युक्तिवाद केला. आता लक्ष्मीपुरी पोलिसांनी हा कागद दोषारोपपत्रामध्ये जोडला आहे. त्यामुळे, तो कोणी दिला, बनावट व्हाउचरमध्ये खाडाखोड करून नवीन व्हाउचर कोणत्या संगणकावर तयार केले, यामागे कोणती टोळी आहे याचा तपास करण्याची विनंती त्यांनी केली. हा कागद पोलिसांमार्फत आल्याने, न्यायालयाने लक्ष्मीपूरी पोलिसांना नोटीस काढून त्या बनावट कागदाबाबत स्पष्ट अभिप्राय देण्याच्या सूचना केल्या आहेत. लक्ष्मीपुरी पोलिसांनी अभिप्राय देण्यासाठी मुदत वाढवून घेतली आहे. आता लक्ष्मीपूरी पोलीस दि. 16 डिसेंबर रोजी न्यायालयासमोर कोणता अभिप्राय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यासंदर्भात शरद काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,, या बनावट दस्तऐवजाचा कोणत्याही परिस्थितीत सोक्षमोक्ष लावणार आहे. प्रसंगी हायकोर्टमध्ये रीट याचिका दाखल करून, संबंधित दोषींचा शोध लावण्यास भाग पाडणार आहे.