कर्मचाऱ्यांच्या हक्काचे दाम, योजना गेली कुठे? प्रशासन व सभागृह वसुली करणार?
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
निवडणूक संपली, शासनाच्या नवीन धोरणानुसार नवनिर्वाचित सत्ताधारी खुर्चीवर विराजमान होतील. राजकारण आणि सत्ता खुर्चीचा संघर्ष आता संपुष्टात आला आहे. मागील सत्तेच्या काळात जे काही घडले त्याचा आढावाही घेतला जाईल. त्यात कचऱ्या ठेक्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना “त्या” ठेकेदाराने किमान वेतन कायदा धाब्यावर बसून कमी पगार दिला का? पीएफ? ईएसआयसी? दिला की, नाही व भरला की,नाही? चालूचा पगार दिला का? याचा सभागृहाला हिशोब चुकता करावा लागणार आहे. ठेकेदाराकडून गल्लत झाली असेल तर, संपूर्ण रक्कमेच्या वसुलीची जबाबदारी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सदस्य मंडळींना पार पाडावी लागणार आहे.
शिरोळ नगरपरिषदेच्या घनकचऱ्याचा ठेका सलग पाच वर्षे मालक-चालक सर्जेराव पुंदे यांच्या सह्याद्री अॅग्रोकडे होता. सह्याद्री अॅग्रो ही कंपनी आहे की, व्यवसाय करणारे दुकान आहे, याचा सोक्षमोक्ष कायदेशीर पद्धतीने होईल. प्रतिवर्षी कोट्यावधी रुपयांचा ठेका घेणाऱ्या अॅग्रोने, शासनाने दिलेल्या हक्कानुसार कर्मचाऱ्यांना न्याय का दिला नाही? या बाबी तपासून त्याची वसुली करण्याची जबाबदारी नगरपरिषद सभागृह व प्रशासनाला अनिवार्य आहे.
ठेकेदाराने कर्मचाऱ्यांची गळचेपी केली असल्यास, पगार, पीएफ, ईएसआयसी अशी कोट्यावधी रुपयांची रक्कम गेली कुठे? याचा ठेकेदाराकडून लेखी खुलासा घेऊन नगरपरिषद प्रशासन व सभागृहाने कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करण्याची आवश्यकता आहे. शहरातील नागरिकांनी वैयक्तिक, कौटुंबिक आणि सार्वत्रिक तसेच कायदेशीर पद्धतीने न्याय मिळणार या अपेक्षेने, हातात दिलेल्या सूत्रांचा नैतिक वापर, हीच विश्वासार्हतेला मजबूती आणणार आहे. खुर्ची तीच राहणार आहे पण, त्यावर बसणारा व्यक्ती बदलणार आहे. याचे भान ठेवणे तितकेच महत्वाचे आहे.
ते कर्मचारी म्हणतात एवढी मस्ती कशाला?
शिरोळ नगर परिषदेमध्ये सत्ता येण्यापूर्वी काही कर्मचाऱ्यांनी, एवढी मस्ती कशाला? अशा असंविधानिक शब्दांचा वापर करून पृथ्वीराजसिंह व राहुल यादव यांच्या बद्दल जाहिरपणे घृणा व्यक्त केली होती. घृणा व्यक्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांची खबरे म्हणून ओळख आहे. या शिवाय दोन्ही हाताने वरबडून खाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निर्बंध येणार आहेत. परिणामी शिरोळ नगरपरिषदेमध्ये यादव गटाची सत्ता आल्यामुळे कर्मचारी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे, तसेच तिव्र निराशा दाखवून दिली जात असल्याची शहरात चर्चा आहे.