डॉ.मोदी ट्रस्टच्या जागेत व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणाची परवानगी घेतली ?
जयसिंगपूर : खमक्या वृत्तसेवा
डॉक्टर एम. सी. मोदी पब्लिक ट्रस्टला डोळ्यांच्या इस्पीतळासाठी शासनाने दोन एकर जागा मोफत दिली. डॉक्टर मोदी हयात असताना या जागेचा गैरवापर झाला नाही. मोदी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळावर पद्मश्री रत्नाप्पाण्णा कुंभार, शामराव पाटील यड्रावकर अशी दिग्गज मंडळी होती. डॉक्टर मोदी यांच्यासह विश्वस्त मंडळातील दिग्गजांच्या मृत्यूनंतर बाजारभावाप्रमाणे 25 कोटी रुपये मूल्य असलेली दोन एकर जागा व मोदी ट्रस्टचे महत्त्व वाढले. आता या ट्रस्टमध्ये विजय मगदूम यांचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे दोन एकर जागेवर डोळा ठेवूनच विजय मगदूम यांनी डॉ. मोदी ट्रस्टचा कब्जा घेतल्याचे उघड झाले आहे.
डॉक्टर मोदी हे वैद्यकीय क्षेत्रातील बडे प्रस्थ होते. डॉक्टर मोदी मोतीबिंदू झालेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करीत असत, एका दिवशी सर्वाधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. डॉक्टर मोदींच्या कार्याला पद्मश्री रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे पाठबळ होते. त्यांच्याच पुढाकाराने डॉक्टर एम. सी. मोदी पब्लिक ट्रस्टची स्थापना झाली. डॉक्टर मोदी यांचा उद्देश शुद्ध असल्यामुळे त्यांनी विश्वस्त मंडळावर कुटुंबातील लोकांना स्थान न देता सामाजिक, राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळींना स्थान दिले.
1986 मध्ये विश्वस्त मंडळावर डॉक्टर एस. के. पाटील, लक्ष्मीनारायण मालू, डॉक्टर सुभाष आडदांडे, पद्मश्री रत्नाप्पाण्णा कुंभार, शामगोंडा पाटील यड्रावकर, कांतीलाल रुपणाळ गौहनीसाई देसाई, डॉक्टर एम. सी. मोदी व महादेव चिंचवाडकर यांचा समावेश होता.
मोदी ट्रस्टला मिळालेल्या जागेची बाजारभावाप्रमाणे सुमारे 25 कोटी रुपये किंमत आहे. त्यामुळे या ट्रस्टच्या मिळकतीवर डोळा ठेवून, विश्वस्त जसजसे मयत होतील तसतसे “त्या” कुटुंबातील व्यक्तींची नावे मोदी ट्रस्टमध्ये घुसडल्याचे उघड झाले आहे.
विजय मगदूम यांना विश्वस्त म्हणून डॉ.मोदी ट्रस्टवर घ्यावे असा अर्ज धर्मादाय आयुक्तांकडे देण्यात आला. व विजय मगदूम यांचा मोदी ट्रस्टमध्ये शिरकाव झाला. आता हा अर्ज कोणी दिला ? हा वादाचा व चौकशीचा मुद्दा बनला आहे.
काही सामाजिक कार्यकर्त्यांनी बेंगलोर येथील मोदी ट्रस्टच्या कार्यालयाकडे चौकशी केली असता, असा कोणताही अर्ज दिला नसल्याची माहिती प्राप्त झाली. त्यामुळे विजय मगदूम यांनी एक प्रकारे मोदी ट्रस्टच गिळंकृत केला आहे. आता मोदी ट्रस्टच्या जागेवर डॉक्टर मगदूम होमिओपॅथिक कॉलेज व इतर व्यवसाय सुरू आहेत. या एकूण व्यवहाराबाबत शासनाकडे तक्रारी झाल्या असून त्या तक्रारीत काय निष्पन्न झाले ? याचा लेखाजोखा लवकरच जनतेसमोर येणार !