खात्री आणि विश्वास ही दोन अस्त्रे प्रस्थापितांना स्वतंत्र लढण्यास देतात बळ
शिरोळ : शरद काळे
शिरोळ नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सर्वच गट, आघाडी, पक्ष, पॅनेल यांच्याकडून बांधणी करण्यात येत असताना, इच्छुकांचा उमेदवारी मागणीचा सर्वाधिक कल पृथ्वीराजसिंह यादव यांच्याकडे दिसत आहे. तर, दुसऱ्या बाजूला यादव विरोधी लढतीत ताकद कमी पडणार याचा अंदाज घेवून इतरांनी युतीचा दाखला देत, जागा वाटप करून ताकद वाढविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू ठेवल्याची शिरोळ शहरात चर्चा आहे.
देशात आणि राज्यात बलाढ्य मानल्या जाणाऱ्या भाजपाला सुध्दा स्वतंत्र लढण्यास भिती वाटत आहे का ? विकासात राजकारण नको असे जाहिर वक्तव्य करणारे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याही मनात शंकेची पाल चुकचुकत आहे का ? त्यांचा, त्याच्यावरील विश्वास उडाला आहे का ? असा सवाल शिरोळ शहरातील मतदारातून केला जात आहे.परंतू, निधी, विकास आणि राजकारण याचे समीकरण जुळवणाऱ्यांनी मात्र आपल्या वक्तव्यात निधी आला ? पण, प्रत्यक्षात किती खर्च झाला ? बाकीचा कुठे ? याचा हिशोब जनतेला सांगितला नाही.
शिरोळ नगरपरिषदेच्या निवडणूक निमित्ताने एक भीतीची लाट असल्याचे पाहायला मिळत आहे, ही भीती पोटात ठेवून आणि राजकीय पटलावरील खुर्ची ताब्यात ठेवण्याबरोबर वर्चस्व सिध्द करण्यासाठी दोघांची सांगली येथे एक मच्छी पार्टी झाली. या बैठकीत घरातील उमेदवार निवडून आणण्यासाठी दोघांनीही एकमेका विरोधात कच्चे उमेदवार देऊन त्यांचा बळी घेण्याचा प्लॅन तयार केल्याची वस्तुनिष्ठता समोर आली आहे. ही बैठक म्हणजे लढण्यापुर्वीचे मॅच फिक्सिंग आहे. तसेच युती आणि फार्मुला या दोन बाबी भितीला पोषक ठरत असल्याचे लोक बोलताहेत.
नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी अनेकांनी स्वतःलाच प्रबळ उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. पण, त्यांची उमेदवारी जनतेला मान्य आहे का ? नाही, स्वतंत्र की, पक्षाच्या चिन्हावर लढणार ? की, पक्ष, निष्ठा, रुबाब, चिन्ह, खोटे अस्तीत्व “बुडव्या”च्या दावणीला बांधणार ? सगळी पदे घरातच पाहिजेत अशी मनोवृत्ती ठेवणारे स्वबळाचा नारा का देत नाहीत ? यादव यांच्याकडून पराभवाची भिती आहे ? की, संजय पाटील यड्रावकरांची ? आणि अशी भिती हवीच त्याशिवाय अस्तित्व सिध्द होत नाही, अशी शहरात चर्चा आहे.