निवडणुकीपुर्वी पराभव मान्य?, अपमान मान्य?, युती होणार? हे लवकरच समजणार.
शिरोळ : शरद काळे
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका, नगरपंचायत असा निवडणुकीचा हंगाम सुरू झाला आहे. निवडणुक अनुषंगाने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. नुकतेच भाजपाने प्रत्येक उमेदवार पक्षाच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवणार असे स्पष्ट केल्यामुळे यादव पॅनेल वगळून इतर पक्ष, संघटना, संघ, आघाडी यांना भाजप समोर लोटांगण घालावे लागणार अशी स्पष्ट चिन्ह दिसू लागली आहेत.
भाजपाने तालुक्यातील ताकद एकवटत समर्थ मंगल कार्यालयात घेतलेल्या मेळाव्याला पहिल्या टप्प्यात प्रचंड गर्दी उसळली आणि दुसऱ्या टप्प्यात खुर्च्या मोकळ्या पडल्या अशा दोन्ही टप्प्यामध्ये विदारक चित्र पाहिलं मिळाले. त्याचबरोबर मंत्री चंद्रकांत पाटील यांची मेळाव्यास अनुपस्थिती अशा वेगवेगळ्या घटना, शंकेला पूरक ठरत होत्या.
पहिला टप्पा : छायाचित्रातील गर्दी
कामगार, कंत्राटदार ,पेन्शनधारक, शेतमजूर ,कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत नेत्यांनी केलेल्या “कमळ” चिन्हाच्या घोषणेतून, युतीमध्ये सहभागी असलेले कट्टर शिंदे शिवसेना गटाचे आम. राजेंद्र व संजय पाटील यड्रावकर तसेच त्यांच्या राजर्षी शाहू आघाडीच्या अस्तीत्वाला मोठा फटकारा मारल्याचे मतदार, नागरीक बोलत आहेत.
शिंदे गट किंवा राजर्षी शाहू आघाडीशी युती झाली तरी भाजपाचे उमेदवार कमळ या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात कोणत्या चिन्हाचा प्रचार करायचा हा गंभीर प्रश्न समोर येणार आहे. युती नाही केली तर तीन्ही ठिकाणच्या नगराध्यक्ष उमेदवाराला भाजपा आव्हान देऊ शकते. त्यामुळे भाजपा बरोबर युती करणाऱ्यांची, सध्याची अवस्था “धरलं तर चावतंय, आणि सोडलं तर पळतयं” अशी असल्याची मतदार बोलत आहेत.
दुसरा टप्पा : मोकळ्या खुर्च्या
देशात आणि राज्यात बलाढ्य मानल्या जाणाऱ्या भाजपाला युती धर्माच्या नावावर आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याबरोबर युती करावी लागणार म्हणजे, तो एक प्रकारे पराभव मान्य करणे, आणि यड्रावकरांनी भाजपा बरोबर युती करणे म्हणजे झालेला अपमान मुकाट्याने सहन करणे. शिवाय पराभव आणि अपमान बाजूला ठेवून भाजपा व यड्रावकर यांची युती होणे म्हणजे पृथ्वीराजसिंह यादव यांची भिती पोटात ठेवणे असा असल्याचे मतदार बोलत आहेत.