“कमळ” चिन्हाचा नारा, स्वबळाचा?. आ.यड्रावकर यांना थेट आव्हान?
शिरोळ : शरद काळे
भाजपाने आलास पुलाचे उद्घाटन करण्याबरोबर शिरोळ येथे कार्यकर्ते, पदाधिकारी, ठेकेदार, शिपाई, वॉचमन, ऊस वाहतूकदार, पेन्शन धारक, शेतमजूर यांचा महामेळावा घेतला. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी युती झाली तरी भाजपाचे उमेदवार “कमळ” चिन्हावर निवडणूक लढतील असे स्पष्ट जाहीर करून एक प्रकारे “स्वबळाचा” नारा दिल्याची शिरोळ पंचक्रोषित चर्चा आहे.
भाजपाने “कमळ” चिन्हाची केलेली घोषणा एक प्रकारे युतीतील पक्ष, आघाडी, आमदार, खासदार यांना आव्हान देणारी असल्याचे मतदार बोलत आहेत. खऱ्या अर्थाने भाजपाने मा.मंत्री व आ.राजेंद्र पाटील यड्रावकर बंधू संजय यांना हा स्पष्ट इशारा दिला असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, पुलाच्या उद्घाटनाला आ. राजेंद्र पाटील यांना निमंत्रण दिले नसल्याची माहिती सोशल मीडियातून पुढे आली. भाजपाच्या या खेळीवरून आमदार गोटातून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. निमंत्रणाबद्दल आमदार यड्रावकर यांनी हसत खेळत वक्तव्य केले असले तरी, ही घटना “जिव्हारी” लागणारी असून नजीकच्या काळात त्याचे स्वरूप “राजकीय बदला”, “जशाच तसे” या भूमिकेतून पुढे येणार अशी शक्यता मतदारातून व्यक्त केली जात आहे.
भाजपाने शिरोळमध्ये आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देण्याचे जवळपास पक्के केले आहे. परतु, उमेदवार आणि त्याच्या राजकीय कौटुंबिक प्रवासाला शिरोळच्या मतदारांनी कधीच झिडकारले आहे. याचा अंदाज अजून भाजपा श्रेष्ठींना आला नाही.
मागील सहा वर्षात जयसिंगपूर शहरांमध्ये यड्रावकर यांची विकास कामे व राजकारणात झालेली गळचेपी ,यड्रावकर कुटुंबीय विसरून गेले आहेत, असे म्हणणे आज मितिला तरी महामुर्खपणाचे ठरणारे असल्याचे मतदार बोलत आहेत.