भाजपाने कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची स्पष्ट भूमिका जाहीर केल्यानंतर शिरोळ, जयसिंगपूर आणि कुरुंदवाड नगरपालिकेतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. युतीमध्ये पाडापाडीच्या राजकारणाला वेग येणार आहे, चिन्हाचा प्रचार करताना गोची होणार आहे. त्यामुळे आत्तापासूनच काहींनी सावधगिरीची भूमिका घेतल्याचे चर्चेत आहे.
सावधगिरीची भूमिका म्हणून काहींनी “तूम्ही करा, मारल्यासारखं, आम्ही करतो, रडल्या यासारख”, “तूम्ही आम्हाला बाय द्या”, “आम्ही तुम्हाला बाय देतो” आपआपल्या घरापुरतं बघूया, गाव “मुठीत” ठेऊया, गावाचा विकास होवो, अगर न होवो, आपल्याला “सुतक” येण्याचे कारण नाही. फक्त निधीच्या “टक्केवारी”तून “स्वविकास” स्वहित साधूया. हा शेवटचा “चान्स” आहे.
आत्तापर्यंत समजूतीने “राजकारण” केलयं, तुफान “फायदा” उठवलाय, असाच पुढं पण उठवायचा. “त्या” सालच्या निवडणुकीत शेवटचे चार दिवस “आर्थिक” रसद बंद करण्याचा सल्ला ऐकलात, म्हणून जनताभिमुक पारदर्शी कारभार करणारी “ईडा-पिडा” टळली.सुखाने “तिजोऱ्या” भरल्या.”पृथ्वी”ला कावेत घेवू शकलो.
“नेतृत्व” हातात असते तर, खूप बरं झालं असतं. संगनमताने पुढे गेलो असतो. पण, आता थोडं अवघड झाले आहे, कसा मार्ग काढायचा याची चिंता लागली आहे. इकडे “तो” आणि तिकडे “त्यो” दमवू लागले आहेत. अशी भावना व्यक्त करून काहींनी परफेक्ट प्लॅन केल्याची चर्चा आहे.
राजकारणाच्या वयाचा विचार केला तर, युवक आणि तरुणांची ताकद वाढली आहे. ही वाढलेली ताकद जुने राजकीय अस्तित्व नष्ट करणारी आहे. त्यामुळे सत्तेच्या खेळात इतरांना “पृथ्वी”तलावर राजकीय झेंडा फडकवू देता कामा नये. यासाठी काहीतरी केले पाहिजे. अशी गुप्तगू सुरू असल्याचे समजते.