शिरोळ तालुक्यात पृथ्वीराजसिंह यादव यांचे पॅनेल सर्वाधिक सुरक्षित !
पक्षप्रमुख, मंत्र्यांच्या सूचना व इशाऱ्यामुळे चित्र बदलण्याची शक्यता.
आम. यड्रावकर बंधू गप्प बसतील असे वाटत नाही.
जयसिंगपूर/शिरोळ/कुरुंदवाड : शरद काळे
शिरोळ तालुक्यातील नगरपरिषदांच्या निवडणुकीमध्ये पॅनेलची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपाने आपले उमेदवार कमळ चिन्हावर निवडणूक लढवतील अशी घोषणा करून इरादा स्पष्ट केला आहे. त्यामुळे राजर्षी शाहू आघाडीबरोबर भाजपाची युती होण्याची शक्यता मावळत निघाली आहे. चिन्हाची घोषणा आणि पूल उद्घाटन करताना दिलेली वागणूक तसेच जयसिंगपूर नगरपरिषदेमध्ये भाजपाने नगराध्यक्षपदावर निवडून आणलेला उमेदवार अशा बाबी आमदार राजेंद्र पाटील व संजय पाटील यड्रावकर विसरतील असे आज मितिला तरी वाटत नाही.
दरम्यान, उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नगरपरिषदांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर धनुष्यबाण चिन्ह घानवट ठेवायचे आहे का ? असा सवाल करून स्थानिक नेत्यांना सज्जड दम दिल्याची सर्वत्र चर्चा आहे त्याचा परिणाम शिरोळ जयसिंगपूर आणि कुरुंदवाड नगरपालिकेमध्ये कसा होणार हे चित्र लवकरच पाहायला मिळणार आहे.
राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घड्याळ हे चिन्ह कोल्हापूर जिल्ह्यातील घराघरात पोहोचले पाहिजे. नगरपरिषदांच्या निवडणुका घड्याळ चिन्हावरच लढवाव्या लागतील. आणि सत्ता स्थापन करावी लागेल.अशी सूचना मंत्री हसन मुश्रीफ यांना देऊन, असे न घडल्यास आपले मंत्रिपद धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही असा इशारा दिल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर आत्ता पर्यंत सर्व मागण्या पुर्ण केल्या आहेत. त्यामुळे आता घड्याळ चिन्हावर लढायचं असाही फटकारा “32 हजार” बुडव्याला लगावल्याचे समजते.
एकूणच राज्य पातळीवरील पक्षाच्या नेत्यांचा आढावा घेतला तर शिरोळ तालुक्यातील नगरपरिषदांच्या निवडणुका पक्षीय चिन्हाबरोबर राजर्षी शाहू आघाडीच्या चिन्हावर होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे नगरपरिषदांमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, राजर्षी शाहू आघाडी यांच्यात लढत होण्याची शक्यता अधिक आहे. याशिवाय युती झाली तर पाडापाडीच्या राजकारणाला प्रचंड, भयंकर वेग येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या गंभीर बाबीचा आत्तापासूनच विचार करण्याची आवश्यकता आहे.
दरम्यान, शिरोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीचा आढावा घेतला असता, युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी स्वतंत्र पॅनेल करून लढण्याचा पवित्रा मतदारासमोर ठेवला आहे. आणि तो पवित्रा तमाम मतदार आणि नागरिकांनी मान्य केल्याचे स्पष्ट दिसत आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने यादव यांच्याकडून अत्यंत गोपनीय रित्या तयारी करण्यात येत असून नजीकच्या काही दिवसात उमेदवारांची घोषणा करण्यात येणार असे चित्र दिसत आहे.