दोन दिवसापूर्वी आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे आणि अमोल गावडे या तिघांना अज्ञातंकडून मारहाण करण्यात आली. या घटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटना व गरजवंत शेतकऱ्यांचा लढा यांनी तीव्र निषेध नोंदवून भव्य मोर्चा काढण्याचा इशारा दिला. हा प्रकार दत्त साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवल्यामुळे झाल्याचे ठळकपणे समोर आला. या मारहाणीमुळे दत्त साखर कारखान्याचे सर्वेसर्वा गणपतराव पाटील आणि कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील तसेच शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना यांच्या कारभाराबाबतीत शहरी भागासह ग्रामीण भागात शेतकरी, शेतमजूर, नागरिक तसेच सामान्य वर्गातून तीव्र नाराजी, संताप व्यक्त करण्यात आल्याची समजते.
चेअरमन रघुनाथ पाटील यांच्या ऐवजी संचालक गणपतराव पाटील यांनी जाहीर केलेला 3,400 हा दर शेतकऱ्यांना अमान्य असल्याची पहिले वृत्त “खमक्या”ने प्रसिद्ध केल्यानंतर शहरी व ग्रामीण भागात जागृती निर्माण झाल्याचे लोक बोलतात. आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर जो काही प्रकार घडला त्यामागे गणपतराव पाटील आणि एम.व्ही.पाटील यांचा हात असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली. जे काही करायचे ते “झाकली मूठ सव्वा लाखाची” “मनात एक आणि ओठात एक” अशी भूमिका ठेवून “काट्याने काटा काढायचा” असा प्लॅन केला जातो. नेहमीच दुसऱ्याच्या खांद्याचा वापर करायचा या “धूर्त” खेळीचा भविष्यातील राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे नागरिक, शेतकरी बोलत असल्याचे समजून येत आहे.
गणपतराव पाटील यांनी साखर कारखान्यातील गोपनीय कामे, ठराविक समुदायाला सन्मान आणि ऊस आंदोलन दडपण्यासाठी तसेच साखर कारखानदारीच्या माध्यमातून स्वतःचे राजकारण चालवण्यासाठी काही ठराविक माध्यमांना हाताशी धरले आहे. त्यांचा वर्षाचा अनेक लाखो रुपयांचा खर्च सभासदांच्या साखर कारखान्यावर टाकूण ते स्वतःचे धुर्त राजकारण करतात, आणि याला कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील यांची मोलाची साथ असल्याचा आरोप सध्या त्यांच्यावर होत असल्याचे समजते.नुकताच पार पडलेल्या गळीत हंगाम शुभारंभासाठी त्यांनी निमंत्रित केलेल्या ठराविक माध्यमांच्या प्रतिनिधीची रांग पाहिली तर, होणारा आरोप तंतोतंत बरोबर असल्याचे वाटत आहे.
साखर कारखान्याच्या विस्तारीकरणाला अंतर्गत विरोध असताना सुद्धा विस्तारीकरण करण्यात आले. यात अनेक कोट्यावधी रुपयांचा घोळ झाल्याचा आरोप केला जात असून तशी चर्चा आजही होत आहे. विस्तारीकरणानंतर कारखाना पूर्ण क्षमतेने चालला नाही त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे अनेक जण सांगत आहेत. कारखान्यात विविध प्रकारची बेरिंग आणि अन्य कोट्यावधी रुपयांच्या साहित्यांची चोरी, रासायनिक खत विक्री प्रकरण व चोरी करणाऱ्यावर कारखान्याने गुन्हा दाखल केला नाही. कारण चोरी करणाऱ्या व्यक्तीला वरिष्ठांनी संगणमताने कोणता कारभार केला आहे, याची माहिती होती. आणि याचा स्फोट पोलीस स्टेशनमध्ये झाल्यानंतर बदनामी होईल, त्या कारणास्तव संबंधितांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे आजही बोलले जात असल्याचे समजते.