लोकशाही व मानवता या महत्त्वपूर्ण तत्वांची पायमल्ली करून, दाम व भेद, टक्केवारी नीतीचा वापर करून सत्ता हस्तगत करण्याची सवय लागलेल्या आम. राजेंद्र व संजय पाटील यड्रावकर बंधूच्या राजर्षी शाहू विकास आघाडीला आता सुट्टी देणार नाही. असा आव्हानात्मक इशारा देत काँग्रेस, राष्ट्रवादी (श.प.गट), शिवसेना (उबाठा), स्वाभिमानी संघटना यांच्या इंडिया आघाडीने जयसिंगपूर, शिरोळ आणि कुरुंदवाड नगरपरिषदेमध्ये नागरी हित आणि विकासासाठी शिरोळ तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा सोमवारी पत्रकार बैठकीत केली.
मा.मंत्री व आम.सतेज उर्फ बंटी पाटील, मा.खा. राजू शेट्टी, दत्त साखरचे सर्वेसर्वा गणपतराव पाटील, युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव, शिवसेनेचे राज्य पदाधिकारी चंगेजखान पठाण, जिल्हाध्यक्ष वैभव उगळे, राज्य पदाधिकारी रावसाहेब भिलवडे, तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे, अनिलराव यादव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दरगू गावडे, आपचे आदम मुजावर, मा.सभापती स्वाती सासणे आदी मान्यवरांनी नगरपरिषद व जि.प. तसेच पं.स.निवडणुकी बाबतचे धोरण स्पष्ट केले.
सोमवारी झालेल्या पत्रकार बैठकीत इंडिया आघाडीतील सहभागी नेत्यांनी राजर्षी शाहू आघाडीच्या कामकाज पद्धतीवर ताशेरे ओढत, वेगवेगळ्या बेकायदेशीर आणि स्वहिताच्या कामकाजाची चिरफाड केली. भुयारी गटार, नगरपरिषद इमारत बांधकाम, झोपडपट्टी, प्रॉपर्टी कार्ड अशा वेगवेगळ्या विषयावर रान उठवून नागरिकांना न्याय देण्यात येणार असल्याचे सांगितले.
नकली बुरखा फाटणार
इंडिया आघाडीने निवडणुकीच्या अनुषंगाने केलेली घोषणा राजर्षी शाहू आघाडीच्या कामकाजाचा बुरखा फडणारी आहे. निवडणुकीत होणाऱ्या आरोपातून आम.राजेंद्र व संजय पाटील यड्रावकर यांनी केलेल्या बोगस व टक्केवारी कामकाजाबरोबर इतर भानगडींची मतदार, नागरिकांसमोर भांडाफोड करून, खरी वस्तुस्थिती मांडली जाणार असल्याचे इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
भाजपाचा राग आणि पाठिंबा ?
राजर्षी शाहू आघाडीचे आमदार राजेंद्र व संजय पाटील यड्रावकर बंधू यांना “सत्ता” आणि “पैशाचा” खूप “ताठा” आहे. ते केंद्रात आणि राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपाला कमी लेखतात. पदाधिकारी कार्यकर्त्यांना तुच्छ वागणूक देतात. परस्पर यांची 5 ते 7 हजार मतांची सुद्धा लायकी नाही.असे वक्तव्य करतात, त्यामुळे त्यांना अद्दल घडवण्याची खरी वेळ हीच आहे, असा पक्का निर्णय करून भाजपाच्या जुन्या नव्या फळीने इंडिया आघाडीला लागेल ते पाठबळ देण्याची तयारी दर्शवली असल्याचे समजते.