शिवसेना, कुरुंदवाडमध्ये स्वतंत्र पॅनेल करणार ? शाहू आघाडीला आयती संधी?
शिरोळ : शरद काळे
काँग्रेस, राष्ट्रवादी (श.प.गट), शिवसेना (उबाठा), स्वाभिमानी संघटना यांच्या इंडिया आघाडीची घोषणा होऊन 24 तास उलटण्यापूर्वीच फूट पडल्याचे खळबळ जनक वृत्त हाती आले आहे. शिवसेनेने कुरुंदवाड नगर परिषदे करीता स्वतंत्र पॅनेल करण्याचा निर्णय घेतला आहे. या वृत्ताबाबत शिवसेनेच्या एका राज्य पदाधिकारी यांनी दुजोरा दिला आहे.
सोमवारी, जयसिंगपूर येथे इंडिया आघाडीची बैठक होऊन जयसिंगपूर, शिरोळ आणि कुरुंदवाड नगरपालिका निवडणुका लढण्याबरोबर जि. प. आणि पं. स.मध्ये सुद्धा एकत्रितपणे लढणार अशी घोषणा आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, मा. खा. राजू शेट्टी आणि गणपतराव पाटील तसेच शिवसेनेचे चंगेजखान पठाण व जिल्हाध्यक्ष वैभव उगळे यांनी पत्रकार बैठक घेऊन केली होती.
काँग्रेस पक्षाचे जिल्हा नेते आमदार बंटी पाटील यांनी जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीचे सर्वाधिकार राजू शेट्टी यांना देण्यात आले आहेत शिरोळ मध्ये पृथ्वीराजसिंह यादव, गणपतराव पाटील आणि स्वतः लक्ष घालणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर कुरुंदवाडमध्ये सुद्धा आघाडी करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. यामध्ये शिवसेनेला तीन पैकी एका सुद्धा नगरपालिकेचे नेतृत्व करण्याची संधी दिली नसल्याचे मत शिवसेना पदाधिकारी व्यक्त करीत आहेत.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवायची की, नाही असा सवाल करून, कुरुंदवाड मध्ये स्वतंत्र पॅनेल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे इंडिया आघाडी मध्ये फूट पडण्याचे संकेत मिळत आहेत. या वृत्ताला शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा दुजोरा मिळाला आहे.