कागदपत्रात फेरफार करण्याचा डाव?, विकास कामात खोडा घालण्याचा प्लॅन?
आता नागरीक मतदारांनी ठरवावे, कचरा,घरफाळा,भयारी गटर,पाणी कुठ मुरतंय?
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
शिरोळ नगरपरिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली असून या निवडणुकीत मतदारांनी यादव पॅनेलला स्पष्ट कौल देत परिवर्तन घडवून आणले आहे. निवडणूक काळात नगरपरिषदेचा कारभार प्रभारी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला होता. यामागचे प्रमुख कारण म्हणजे नियुक्त मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांची कारकीर्द वादग्रस्त व असंविधानिक ठरल्याचे आरोप. दरम्यान मुख्याधिकारी यांनी अचानक आजारी रजा देवून दिर्घ मुदतीसाठी पळ काढला. ते जिल्हा व नगरपरिषद स्तरावर नॉट रिचेबल झाले.त्यानंतर प्रभारी व्यवस्थेअंतर्गत कामकाज सुरू झाले होते.
मात्र, निवडणूक निकालानंतर पुन्हा एकदा निशिकांत प्रचंडराव यांना शिरोळ प्रशासकीय अधिकारीपदी नियुक्त केले आहे. बुधवारी प्रचंड राव यांनी अधिकृतरित्या पदभार स्वीकारला असून प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली आहे. मुख्याधिकारी म्हणून पुन्हा प्रचंड राव नियुक्त झाल्यामुळे शहरवासीयांकडून तीव्र आश्चर्य आणि नाराजीचा वर्षाव सुरू झाला आहे. पालिकेत सत्तांतर घडून आले असताना, यादव गटाला निर्विवाद बहुमत मिळवून देणाऱ्या शिरोळकरांना ही नियुक्ती संशयास्पद वाटत आहे. या नियुक्तीमागे मोठे राजकारण असून, यादव गटाच्या नवनियुक्त लोकप्रतिनिधींना विकासकामांपासून दूर ठेवण्याचा कुटिल डाव असल्याची चर्चाने शहरात काहूर माजले आहे.
गत व चालू कालावधीतील अनेक कामे आणि निर्णय संशयास्पद असल्याचा जाब प्रचंडराव यांना विचारण्यात आला होता. परंतु, प्रचंडराव यांनी नागरिकांच्या प्रश्नाला उत्तर न देता थेट पळ काढल्यामुळे ते वादग्रस्त ठरले होते. त्यांच्या कारभारावर गैरव्यवहार, नियमबाह्य निर्णय आणि सत्ताधाऱ्यांना अनुकूल असे कामकाज केल्याचा आरोप होता व आहे. अशा पार्श्वभूमीवर त्यांची पुन्हा नियुक्ती म्हणजे मागील काळातील घोटाळ्यांच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यासाठी किंवा तत्कालीन सत्ताधाऱ्यांना लाभदायक बदल घडवून आणण्यासाठीच करण्यात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वास्तविक पहाता, प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारात येते, मात्र त्यासाठी विद्यमान आमदारांचे मतही विचारात घेतले जाते, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे या निर्णयामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिरोळची जनता आक्रमक झाली असून, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव हटाव यासाठी गाव बंद, अमरण उपोषण, मोर्चे, नगरपरिषदेला टाळे ठोक अशी आंदोलने छेडण्यात येणार असून त्या दृष्टीने संपूर्ण शहर एकवटले असल्याचे चित्र दिसून येत आहे.