खोटी कागदपत्रे करताना शिरोळ नगरपरिषदेच्या शिक्क्याचा वापर
कोल्हापूर : अक्षय पाटील
दैनिक पुढारीचे तत्कालीन शिरोळ वार्ताहर यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करताना शासकीय व्हौचरमध्ये बनावटगिरी करण्यात आली. शिरोळ नगरपरिषदेच्या जाहिरातीच्या बाबतीतही खोटे दस्तावेज करण्यात आले. त्यासाठी शिरोळ नगरपरिषदेच्या शिक्क्याचा गैरवापर करण्यात आला आहे. आता शरद काळे यांनी फिर्यादी व त्यांच्या साथीदारांवर न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांकडूनही सारवासारव करण्यात येत आहे.
दै. पुढारीचे अकाउंट मॅनेजर व फिर्यादी शिवाप्पा कुंभार याने लक्ष्मीपुरी पोलिसांना पुरावे देताना शिरोळ नगरपरिषदेच्यावतीने खाजगी लेटरपॅडवर नगरपरिषदेचा शिक्का असलेली कागदपत्रे पोलिसांना दिली आहेत. यात कुंभार याने शरद काळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी अशी कागदपत्रे देऊन पोलिसांचीच फसवणूक केल्याचे दोषारोपपत्रातून दिसून येत आहे. यापुर्वी लक्ष्मीपुरी पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या अहवालात एकाच बिलाची दोन व्हाउचर असल्याचा स्पष्ट अभिप्राय नोंदवला आहे. खोटा मजकूर व्हाउचरवर लिहिण्यात आला आहे. मूळ व्हाउचर वर दैनिक पुढारीचे वसुली प्रतिनिधी सागर भुपाल कोळी (कुटवाड) याची सही असून, ती सही बनावट व्हाउचर मध्ये बदलल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीट मध्ये, संबंधिताने पोलिसांकडील तपास टिपणी, जबाब आणि वैयक्तिक लेटर पॅड मध्ये राजर्षी शाहू विकास आघाडी असा उल्लेख केला नाही. सदरची जाहिरात नगरपरिषदे मार्फत असल्याचे कागदपत्रात स्पष्ट नमूद आहे. तीच कागदपत्रे गुन्ह्यात वापरण्यात आली आहेत. मात्र, न्यायालयात अहवाल देताना लक्ष्मीपुरी पोलिसांनी शिरोळ नगरपरिषद शिरोळ यांचे वतीने दैनिक पुढारी वर्धापनदिन निमीत्त जाहीरात दिलेली होती असे वगैरे नमूद आहे. सदरची जाहीरात ही शिरोळ नगरपालिकेने दिलेली नसून, ही जाहीरात साक्षीदार पाटील याने स्वतःहुन दिली असल्याने सदर जाहीरातीची रक्कम नगरपालिकेच्या लेखा परिक्षणामध्ये येणार नाही असे मत नोंदवून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. ऑर्डरमध्ये जाहिरात ग्राहकाचे नाव व राजर्षि शाहू विकास आघाडी असे लक्ष्मीपुरी पोलिसांनी नमुद केले आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार लक्ष्मीपुरी पोलिसांनी पुन्हा कागदपत्राचे अवलोकन केल्यानंतर विसंगत कागदपत्रे असल्याचे दिसून आल्यानेच पोलिसांनी त्या संदर्भातील स्पष्ट अभिप्राय आपल्या अहवालात अधोरेखित केला आहे. परंतु, गुन्हा दाखल करीत असताना वैयक्तिक लेटर पॅड, पोलिसातील जबाब आणि तपास टिपणी मध्ये राजर्षी शाहू विकास आघाडी असा उल्लेख असणारा कागद जोडण्यात आला नाही. त्यामुळे पोलिसांनी सादर केलेल्या अभिप्रायानुसार शिरोळ नगरपरिषदेकडील जाहिरातीच्या अनुषंगाने फिर्यादी व त्याच्या अन्य साथीदारांनी लक्ष्मीपूरी पोलिसात व पोलिसांकडून न्यायालयात दिलेल्या कागदपत्रांमध्ये तफावत असल्याचे पोलिसांकडून अहवालात मान्य करण्यात आले आहे.
विद्यमान तपास अधिकारी व्ही.एन. जाधव यांनी नगरपरिषदेमार्फत देण्यात आलेल्या जाहिरातीची सखोल चौकशी करून तसा अहवाल न्यायालयात सादर करण्याची आवश्यकता आहे. या प्रकरणात पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव, व्यवस्थापकीय संपादक योगेश जाधव, ग्रुप जनरल मॅनेजर अनिल पाटील, अकाउंट मॅनेजर शिवाप्पा कुंभार, ग्रामीण जाहिरात मॅनेजर जाहीदहुसेन शेख आणि वसुली प्रतिनिधी सागर कोळी यांच्याविरुद्ध शरद काळे यांनी न्यायालयात फिर्याद दिली आहे.