शिरोळ नगरपरिषद निवडणुकीची राज्य पातळीवर दखल, जयसिंगपूर, कुरुंदवाड पेक्षा जादा निधी मिळणार
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
शिरोळ नगरपरिषद निवडणुकीनंतर आता लवकरच यादव गटाकडून पदभार स्वीकारला जाणार आहे. निर्विवाद वर्चस्व ठेवत योगिता कांबळे या नगराध्यक्ष पदावर निवडून आल्या आहेत. नगरपरिषद अधिनियमानुसार आवश्यक ती कागदपत्रे जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आली आहेत. लवकरच त्या अनुषंगाने निर्णय होऊन नगरपरिषद कामकाजाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे.
ग्रामपंचायत , पंचायत समिती आणि नगरपरिषद कामकाजातील अनुभव विचारात घेता नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा यापूर्वीचा कामातील अनुभव हा शहर, व्यक्ती विकास आणि कुटुंब विकासात भर घालणारा ठरतो. तसेच जिल्हा व राज्य पातळीवरचे संबंध, वेगवेगळ्या खात्याचे मंत्री, खासदार, आमदार यांच्याशी असणारे राजकीय नाते आणि शहरासंबंधित असणारी खोलवरची माहिती उपयोगास येणार आहे.
राजकारण, समाजकारण, राजकीय संबंध, अनुभव, लोकसेवा भाव, भ्रष्टाचार मुक्त कारभार या बाबी पृथ्वीराजसिंह यादव यांच्याशी तंतोतंत जुळणाऱ्या असल्यामुळे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाचा भार यादव यांच्याकडे जाणे शहराच्या दृष्टीने हिताचे ठरणारे आहे. तसा शहरातील जाणकर व प्रमुख आणि नागरिक, मतदारांनी रेटा लावल्याने पृथ्वीराजसिंह हेच पाच वर्षासाठी उपनगराध्यक्ष पदावर कायम राहतील अशी शक्यता बळवली आहे.
कोणत्याही पक्षाची ताकद वा मतदार निधी, खर्च न घेता स्वतंत्रपणे यादव आघाडी करून नगराध्यक्ष पदासह 16 सदस्य निवडून आणून निर्विवाद वर्चस्व निर्माण करण्यात पृथ्वीराजसिंह यादव, राहुल यादव यशस्वी झाले. याची दखल राज्यपातळीवर घेण्यात आली असून अनेक मंत्री, खासदार, आमदार यांनी लागेल तेवढा निधी, नगरपरिषदेला देण्यासाठी स्वतःहून सहमती दर्शवल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
नगरपरिषद नियम, कायदा याची नागरिकांना जवळून माहिती झाल्यामुळे आता दुसऱ्या टर्मच्या यादव गटाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. या अपेक्षांची पूर्तता होण्यास कोणताही अडथळा नाही परंतु, धडपड महत्त्वाची असल्यामुळे पृथ्वीराजसिंह यादव यांच्याकडे उपनगराध्यक्ष पदाची धुरा असणे शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.आणि यावर लवकरच शिक्कामोर्तब होईल.