सध्या, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा हंगाम सुरू झाला आहे. अनेकांनी स्थानिक ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून मंत्रालयातील सचिवांपर्यंत खासदार, आमदारांच्या मध्यस्थीने “मलईदार” टेबल मिळावा, यासाठी वटकन लावले आहे. परंतु, जिल्हाधिकारी यांनी सदरची बदली प्रक्रिया पारदर्शक व्हावी, कोणती तक्रार येऊ नये याची दक्षता घ्यावी, अशा सूचना संबंधितांना दिल्याचे समजते.
दरम्यान, जिल्ह्यातील तहसीलदारांनी, आदर, निष्ठा, प्रेम, मर्जीतील कर्मचारी आपल्याच तालुक्यात रहावा. अशी फिल्डिंग लावण्याबरोबर काही अधिकाऱ्यांनी बदली पात्र पण, मर्जीतील कर्मचाऱ्यांची नावे जिल्हा पातळीवर कळवली नसल्याची चर्चा वेगवेगळ्या तालुक्यात सुरू असल्याचे समजते.
शिरोळ तालुक्यामध्ये जयसिंगपूर, यड्राव, मौजे आगर, उदगाव, अर्जुनवाड, घालवाड, कनवाड, कुटवाड, शिरटी, हसुर व नदीपलीकडील सात गावे तसेच खिद्रापूर, राजापूर आणि राजापूरवाडी ही गावे भरपूर जादा व जादा प्रमाणात मलईदार असल्याचे बोलले जात आहे.
दगड, माती, वाळू, मुरूम उत्खनन, स्टोन क्रेशर व्यवसाय तसेच जयसिंगपूर शहरात होत असलेली बेसमेंट अपार्टमेंट बांधकामे, शहरालगत होणारी बिगरशेती या बरोबर पश्चिम व दक्षिण भागातील बॉक्साईड उत्खनन यातून दरमहा लाखो रुपयांची माया-प्रेम उपलब्ध होते. त्यामुळे अनेक जण मलईदार मायेवर टपून आहेत. तर, काहीजण ही गावे सोडायलाच तयार नाहीत.अशी चर्चा आहे.