तुमच्या नगरपरिषदेची लुटमार झाली आहे, बनावट पावती बुक छापून थेट फसवलयं, अंकूशमुळे 2.41 लाखाचा अपहार उघडकीस आलायं !
घराची कौल विकून तुम्ही कर भरा, तो आरसीसी बांधकाम करतोय भराभरा… आता चार महिन्यानंतर जे करायचं आहे, ते डोळे उघडे ठेवून करा.
संशयित लोंढे व बल्लारी यांना दि.23 पर्यत पोलिस कोठडी, अन्य मोमीन,ईगल इन्फ्राचे प्रतिनिधी व कर्नाळे अटक पुर्वसाठी !
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
शिरोळ नगरपरिषदेचे कर्मचारी व ठेकेदार यांचे प्रतिनिधी यांनी संगणमत करून नवीन पाणीपुरवठा योजनेतून नवीन नळ कनेक्शन देऊन मिळकत धारकांकडून डिपॉझिट म्हणून नागरिकांकडून स्विकारलेली 1,700 रुपये प्रमाणे जमा केलेली रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून, मिळकत धारकांना बनावट पावती देऊन 2 लाख 41 हजार 300 रुपये यांचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे, या प्रकरणी शिरोळ पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पाणीपुरवठा अभियंता सुहेब रशिदअहमद काजी यांनी फिर्याद दिली असून आंदोलन अंकुश संघटनेच्या पाठपुराव्यानंतर नगरपरिषदेला हा गुन्हा दाखल करावा लागला आहे. फिर्याद दाखल होण्यापूर्वी अंकुशचे पदाधिकारी व एक पोलीस कर्मचारी यांच्यात बाचाबाची झाली. मात्र प्रकरणावर पडदा पाडल्याची चर्चा पोलीस ठाणे आवारात रात्री रंगली होती.
बेईमानी करून शासकीय पैशाचा दुरुपयोग करणे, पैसे हडप, अपहार करणे, खोटे कृत्य, फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्र तयार करणे, निष्काळजीपणा बेपर्वाई, जाणून बुजून चुकीच्या पद्धतीने काम करणे, लोकसेवक कायद्याचे उल्लंघन करणे अशा कामांतर्गत पोलिसांनी विनायक बजरंग लोंढे, मल्लिकार्जुन कद्राप्पा बल्लारी, विश्वास अर्जुन कर्नाळे, ईगल इन्फ्रा इंडिया लि. चे प्रतिनिधी सर्व रा. शिरोळ आणि तत्कालीन पाणीपुरवठा अभियंता अमन जाकीर मोमीन, सांगली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी संशयित आरोपी पैकी काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असून रात्री उशिरा अटक प्रक्रिया पुर्ण करण्यात आली आहे.मल्लिकार्जुन बल्लारी व विनायक लोंढे यांनी 2 लाख 41 हजार 300 रु.चा अपहार केला आहे. तसेच ही रक्कम तत्कालिन पाणी पुरवठा अभियंता अमन जाकीर मोमिन यांच्या सांगण्यावरुन दिली असल्याचे स्पष्ट दिसुन आले आहे.
खेरीज ईगल इन्फ्राच्या प्रतिनिधीना अधिकार नसताना रक्कम स्विकारुन अपहार करून नगरपरिषदेची फसवणुक केली आहे.याशिवाय मल्लिकार्जुन कद्राप्पा बल्लारी याने बनावट सामान्य पावती पुस्तक छापून नागरिकांना बनावट पावत्या दिल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, मंगळवारी अटकेत असलेल्या लोंढे व बल्लारी यांना जयसिंगपूर न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दि. 23 पर्यंत पोलीस पाटील ठेवण्याचे आदेश दिले आहेत.