कोल्हापुर जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातील चंदन झाडाच्या चोरी प्रकरणातील संशयीत आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला.
कोल्हापूर : खमक्या वृत्तसेवा
सातारा मधून येऊन, कोल्हापुरात जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातील चंदनाचे झाड चोरल्याच्या गंभीर प्रकरणात अडकलेल्या संशयित आरोपी शंकर सदाशिव तुपे याचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज कोल्हापूर सत्र न्यायालयाने दि.11 जुलै रोजी फेटाळला.
आरोपीने गुन्ह्यात वापरलेली मोटार गाडी अद्याप जप्त नाही तसेच मध्यप्रदेशातील इतर फरार आरोपींची चौकशी करण्यासाठी आरोपी तुपे हे ताब्यात राहणे आवश्यक असल्याचे पोलीस व सरकारी पक्षाच्या युक्तिवादानंतर मे. न्यायालयाने निर्णय दिला आहे.
चंदनाच्या झाडाच्या झाडाची चोरी करण्यासाठी आरोपी साताऱ्यातून मोटार गाडीतून कोल्हापूरमध्ये जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात येतो आणि चोरी करून पुन्हा साताऱ्याला निघून जातो. या गंभीर चोरी प्रकरणाचा समुळ तपास होणे करीता न्यायालयाने दिलेला निर्णय, इतर फरार आरोपींचा शोध घेण्यास पोलीसांना उपयुक्त ठरणार आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की, 21 जानेवारी 2025 रोजी सकाळी, चतुर्थश्रेणी कर्मचारी चेतन जाधव हे कामावर आल्यानंतर त्यांना न्यायालय आवारातील संरक्षण भिंत व तारेचे कुंपण तोडले असून एक चंदनाचे झाड कापलेले व त्याचा गाभा चोरीला गेल्याचे दिसले. जाधव यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिस तपासात मुख्य आरोपींनी शंकर तुपे याचे नाव घेतले. त्यानंतर पोलीसांनी तुपेचा आरोपी म्हणून तपासात समाविष्ट केला. युक्तिवादात अॅड. बी. ए. सोनुले यांनी तुपे हे शेतकरी असून त्यांना खोटेपणाने गोवले आहे. घटनेच्या दिवशी साताऱ्यात असल्याचे पुरावे दिले. तसेच पोलिसांनी अन्य दोन आरोपींचा तपास केला नाही. तुपेवर पूर्वगुन्हे नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील व्ही. एच. शुक्ला यांनी जामीन अर्जाला विरोध केला. तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी हा चंदन झाडे तोडून विकण्याच्या गुन्ह्यांत सराईत असून त्याच्याविरुद्ध तपास सुरु आहे.
दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश सौ. अपर्णा एस. वैकार यांनी निकालात म्हटले की, प्राथमिक टप्प्यावर सहआरोपींनी दिलेली माहिती फेटाळता येत नाही. मुद्देमाल व कार अजूनही जप्त व्हायची आहे.गुन्हा मध्यरात्री घडला असून अर्जदाराचे साताऱ्यात असल्याचे दाखले निर्णायक नाहीत.सहआरोपींनी अर्जदाराचे नाव घेण्यात कोणताही हेतु पुरस्कृत खोटेपणा दिसत नाही.या सर्व बाबींचा विचार करून अर्जदाराचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला. मात्र अटक करताना, पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अर्नेश कुमार प्रकरणातील मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे निर्देश दिले.