पोलिसांना अज्ञात आरोपीच्या तपासावरून “इकडे आड, तिकडे विहीर” अशा परिस्थितीतून मार्ग काढावा लागणार असल्याची चर्चा !
बंदोबस्तातील, मालकीच्या जागेवरील वृक्षाची तोड अज्ञाताने केली, अज्ञाताला ताब्यात घेऊन कारवाई करण्याचे आव्हान !
शिरोळ / जयसिंगपूर : खमक्या वृत्तसेवा
जयसिंगपूर शहरात, कायदेशीर परवानगी विना वृक्षतोड करून त्याची परस्पर विल्हेवाट लावल्याचे प्रकरण गाजत आहे. दुसऱ्या बाजूला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातील चंदनाच्या झाडाची वृक्षतोड करून त्याची चोरी केल्या प्रकरणी न्यायालयाने सातारा येथील शंकर सदाशिव तुपे या संशयिताचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याची ताजी घटना आहे.
या दोन घटनेनंतर श्री दत्त साखर कारखान्याच्या मालकीच्या जागेतील अशोकाची 10 वृक्षे विनापरवाना तोडल्याच्या प्रकरणाने तोंडवर काढले आहे. कोल्हापूरात चंदनाच्या वृक्षाची चोरी, जयसिंगपूरात व शिरोळमध्ये झालेल्या विनापरवाना वृक्षतोड प्रकरणाचा पोलीस कोणत्या अँगलने तपास करणार ? कोणावर गुन्हा दाखल करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
येथील श्री दत्त साखर कारखान्याच्या कंपाउंड बाहेरील, अशोकाची जुनी, अंदाजे वीस वर्षे वयाची दहा झाडे बेकायदेशीररित्या तोडून त्याची विल्हेवाट लावल्याप्रकरणी शिरोळ पोलिसात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांना अज्ञात आरोपीच्या तपासावरून इकडे आड तिकडे विहीर अशा परिस्थितीतून मार्ग काढावा लागणार असल्याची चर्चा शिरोळ शहरात रंगली असल्याचे समजते
महेश जाधव याच्या तक्रार अर्जानंतर नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता श्रीधर हुबूले यांनी दि. 8 जुलै 2025 रोजी वृक्ष सहाय्यक अधिकारी, वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य यांच्या उपस्थितीत वृक्षतोड केल्याची खात्री करून, रितसर पंचनामा करून अज्ञाता विरोधी फिर्याद नोंदवली आहे. पोलिसांनी अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वृक्षतोड झालेली जागा श्री दत्त साखर कारखान्याच्या मालकीची असल्यामुळे नगरपरिषदेने पत्रव्यवहार करून वृक्षतोडी संदर्भात माहिती मागवली असता कारखान्याचे कार्यकारी संचालक यांनी कोणत्याही प्रकारे वृक्षतोड केलेली नसुन, व्यवस्थापनाचा कोणत्याही प्रकारे याच्याशी संबंध नाही असे नमुद केले असल्याचे फिर्यादीवरून दिसून येत आहे.
पोलिसांनी वृक्षतोड करणाऱ्या अज्ञाताचा तपास सुरू केला असला तरी नगरपरिषदमध्ये अर्ज दाखल करणाऱ्या तक्रारदाराकडे अशोक वृक्षतोडी संदर्भातील सबळ पुरावे (उदा. व्हिडिओ शूटिंग, मोबाईल फोटो) असल्याचे समजते. त्यामुळे पोलिसांना याप्रकरणी वस्तुनिष्ठ तपास करून कारवाई करावी लागणार अशी चर्चा सुरू आहे.