सोमवार दि.14 रोजी तीन महिन्याचा थकीत पगार, पाच वर्षाचा पीएफ आणि ईएसआय भरणा न केल्याच्या कारणातून घनकचरा ठेक्याकडील कामगारांनी युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्या उपस्थितीत ठेकेदार सर्जेराव पुंदे याला शासन व कामगारांच्या फसवणुक विषयी जाब विचारला.
ठेकेदाराने पगार न दिल्यामुळे, कामगारांनी मागील दहा दिवसापासून शहरात कचरा उठाव करणे, गटारी साफ करणे, रस्ते स्वच्छ करणे अशा कामावर बहिष्कार टाकून काम बंद ठेवले आहे.पर्यास्त शहरात कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत, रोगाचा फैलाव वाढत आहे, प्रचंड दुर्गंधीमुळे नागरिक अस्वस्थ झाले आहेत.
युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी नागरी सेवा सुविधा प्रश्नावर मुख्याधिकारी अजय नरळे यांना जाब विचारत शहराची तात्काळ स्वच्छता करावी. काम बंद पुकारलेल्या कामगारांचा थकीत पगार, पीएफ आणि ईएसआय का दिला नाही, भरला नाही. याचा ठेकेदाराकडून तात्काळ खुलासा घ्यावा, प्रत्यक्ष जाब विचारावा अशी मागणी केली.
शहरात नागरिकांना आरोग्य विषयक कोणतीही सेवा न पुरवता, त्याचे बिल काढून घेवून पुंदे याने शासन व नगरपरिषद तसेच कामगारांची फसवणूक केली आहे. ठेक्याकडे कमी कामगार लावून, प्रत्यक्ष जादा कामगारांच्या नावे, पगाराच्या पैशाची उचल करून शासनाच्या पैशाची चोरी केली आहे, त्याच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा का दाखल केला नाही ? असा जाब यादव यांनी नरळे यांना विचारला.
ठेकेदार व नगरपरिषदेच्या अनागोंदी, गलथान कारभारामुळे शहरात आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन एखाद्या मनुष्यास हानी पोहोचल्यास प्रशासनाला जबाबदार धरले जाईल, जबाबदारी निश्चित करून फौजदारी गुन्हे दाखल करू असा इशारा देऊन, त्या आशयाचे निवेदन नरळे यांना दिले. यावेळी नरळे यांनी ठेकेदार पुंदे याला नोटीस काढून दंडात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.