नियमबाह्य कामकाजाला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी “पुंदे” सरांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांची लाखोच्या पटीत ओटी भरली ?
ठेकेदार पुंदे सर यांना पाठीशी घालण्यामध्ये सर्व स्तरावरील अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी यांचा सहभाग असल्याची चर्चा !
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
शहरातील “घनकचरा” टेंडरच्या माध्यमातून “पुंदे” सरांनी नागरिकांना “अमरत्व” देत असल्याचे वरकरणी दाखवले, त्यानंतर नगरपरिषद प्रशासनातील काही विभागीय अधिकाऱ्यांची लाखोच्या पटीत ओटी भरून, नियमबाह्य कामकाजाला कायदेशिर स्वरूप देवून, स्वतःच्या तोंडातील “थुंकी” बोटाला लावून गावातील नागरीकांच्या कपाळाला लावल्याची शहरात चर्चा आहे.
शहरात नागरिकांना आरोग्य विषयक कोणतीही सेवा न पुरवता, सेवा पुरवली अशी बिले काढून, पुंदे याने शासन व नगरपरिषद तसेच कामगारांची फसवणूक केली, ठेक्याकडे कमी कामगार लावून, प्रत्यक्ष जादा कामगारांच्या नावे, पगाराच्या पैशाची उचल करून शासनाच्या पैशाची चोरी केली, त्याच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा का दाखल केला नाही ? असा जाब “पृथ्वीराजसिंह यादव” यांनी सोमवार दि.14 रोजी नरळे यांना विचारला.
ठेकेदार व नगरपरिषदेच्या अनागोंदी, गलथान कारभारामुळे शहरात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊन एखाद्या मनुष्यास हानी पोहोचल्यास प्रशासनाला जबाबदार धरले जाईल, जबाबदारी निश्चित करून फौजदारी गुन्हे दाखल करू असा इशारा देऊन, त्या आशयाचे निवेदन नरळे यांना दिले. यावेळी नरळे यांनी ठेकेदार पुंदे याला नोटीस काढून प्रतिदिन पाच हजार रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र यादव यांनी या कारवाईस स्पष्ट नकार दिला.
घनकचरा ठेकेदार “पुंदे” सर आणि त्याच्या “वाड्या”-“वस्त्या” वरच्या साथीदाराने केलेले कांड “न भूतो, न भविष्यतो” असे असल्याचे बोलून “जिंदाबाद”-“जिंदाबाद” पुंदे सर, “जिंदाबाद” अशी मनोमनी घोषणा नागरिक देत असल्याचे समजते. सध्या शिरोळ शहरातील कामगार आणि नागरिकांच्या पोटचा घास आणि नागरी सेवा सुविधांची चोरी झाली असून या गंभीर प्रकरणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पोलिसात गुन्हा दाखल करावा अशी मागणी शहरातील सर्व स्तरावरील नागरिकांकडून होत असल्याचे कळते.