“पीएफ” म्हणून कामगारांच्या पगारातून रक्कम काढून घेतली पण, पीएफ अकाउंटला भरलाच नाही ?
पीएफ कट केला, किमान वेतन पगारावर, आणि प्रत्यक्षात 7,500 रू.पगार दिला, “पुंदे” सर आणि “बुडव्या” या दोघांनी गावाला लुबाडले ?
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
शिरोळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष दालनात घनकचरा ठेक्याकडील कामगार, मुख्याधिकारी नरळे, इतर प्रशासकीय अधिकारी आणि पृथ्वीराजसिंह यादव व त्यांचे शिष्टमंडळ यांच्यात सोमवार दि.14 रोजी झालेल्या बैठकीदरम्यान, ठेकेदार पुंदे याने कामगार आणि नागरिकांची कशी फसवणूक केली, याचा उलगडा झाल्यानंतर पुरुष व महिला कामगारांनी ठेकेदार पुंदे याच्यावर थेट खालच्या भाषेत शाब्दिक हल्लाबोल केल्याची शहरात चर्चा आहे.
कोकणात, पन्हाळ्यामध्ये आणि शिरोळ शहरात दोन ठिकाणी कोट्यावधीची गुंतवणूक करणे सोपे झाले पण, कामगारांचा थकीत पगार, पीएफ, ईएसआय देणे अवघड कसे होत आहेत ? असा सवाल सुद्धा महिला, पुरुष कामगारांनी केल्याचे समजते. ठेकेदार “पुंदे” सर आणि त्याच्या “बुडव्या” साथीदाराने केलेल्या करामती बाहेर पडू लागल्यामुळे शहरात संतापाची लाट निर्माण झाल्याचे लोक सांगत आहेत.
बैठकीत सर्वांना समसमान पगार का नाही ?, किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार का दिला नाही ?, कामगारांना आरोग्य सेवा का दिली गेली नाही ?, कामगारांचा पीएफ व ईएसआय का भरला नाही ?, रविवारच्या सुट्टीच्या दिवशीचा पगार कुठे गेला ?, 16,750 पगार असताना केवळ साडेसात हजार, साडेनऊ हजार, बारा – तेरा हजार रुपये असा पगार का दिला ? असा जाब कामगारांनी विचारला.
काम आम्ही करणार, चैनी तुम्ही करणार हा कोणता न्याय ?, प्रत्येक कामगाराच्या प्रत्येक पगारातून कट करून घेतलेले साडे सोळाशे रुपये कुठे गायब केले ?, खोरे-पाटी, खुरपे असे साहित्य देण्याची तरतूद असताना त्याचे पैसे कामगाराकडून का वसूल केले ?, आरोग्य संरक्षण साहित्य का दिले नाही ? बँक खात्यावर पगार का जमा केला नाही ?, आतापर्यंत ओळखपत्रे का दिली नाहीत ? अशा वेगवेगळ्या मुद्द्यावरून कामगारांनी “पुंदे” सरांचा खिस काढला.
पगारा पोटी जादा पैसे देऊन पुन्हा त्याची वसुली का केली ? अशा प्रश्नांचा भडीमार करून कामगारांनी ठेकेदार पुंदे यांच्या काळ्या कारभाराचे वाभाडे काढत आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. निरुत्तर झालेल्या ठेकेदार “पुंदे” सरांना कामगारांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाला समर्पक असे उत्तर देता आले नाही. यावरूनच “पुंदे” सर व त्याच्या “वाड्या”-“वस्त्या”वरच्या साथीदाराने कसे गावाला लुबाडले हे स्पष्ट होत असल्याचे लोक बोलत आहेत.