महाराष्ट्रातले मंत्री, मोठे अधिकार हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत असे नाना पटोले यांनी बुधवारी विधानसभेत सांगितलं होतं. आज गुरुवारी आम.नाना पटोले यांनी यासंदर्भातला पेन ड्राइव्हच दाखवला. शिवाय ठाणे, नाशिक, मुंबई ही हनी ट्रॅपची केंद्र बनली आहेत, असाही आरोप काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी केला. माझ्याकडे पेन ड्राइव्ह आहे आणि सरकारचं मत असेल तर, तो दाखवू शकतो असेही नाना पटोले विधानसभेत म्हणाले.
हनी ट्रॅपच्या माध्यमातून राज्याची महत्त्वाची कागदपत्रे अँटी सोशल मुव्हमेंटच्या हाती चालली आहेत. मला कुणाचंही चारित्र्यहनन करायचं नाही. मात्र, या सगळ्याबाबत सरकार गंभीर नाही. साधं निवेदनही द्यायला तयार नाही. त्यामुळे अध्यक्षांनी याबाबत निर्देश द्यावेत अशी विनंती आम.नाना पटोलेंनी केली.
राज्यातील 72 हून अधिक अधिकारी, काही मंत्री हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकले आहेत. हनीट्रॅप करणाऱ्यांकडून गोपनीय माहिती गोळा केली जात आहे. तसेच काही अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्यात आले असून त्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा विचार केला. सरकार यावर काही बोलायला तयार नाही.
नाशिकचं हनी ट्रॅप प्रकरण गंभीर-जयंत पाटील
नाशिकचं हनी ट्रॅप प्रकरण गंभीर आहे, असं आमदार जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांनीही या सगळ्या प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी निवेदन द्यायला पाहिजे अशी मागणी केली. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी या मुद्द्याची दखल घेतल्याचे म्हटलं आहे.