क्षारपडमुक्तीचा पॅटर्न राबविल्याबद्दल गणपतराव पाटील यांचा विशेष सन्मान.
शिरोळ : विशेष वृत्त
नवी दिल्ली येथे दि.24 ते 26 जुलै दरम्यान, भारत मंडपम, कन्व्हेन्शन सेंटर, येथे शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया (एसटीएआय)चे 83 वे (शताब्दी) वार्षिक अधिवेशन आणि आंतरराष्ट्रीय साखर प्रदर्शन पार पडले.
अधिवेशनात श्री दत्त साखर वतीने ऊस शेती, सेंद्रिय कर्ब वाढ आणि जमीन क्षारपड मुक्ती संदर्भात तांत्रिक संशोधन प्रबंधाचे सादरीकरण करण्यात आले.
अधिवेशन कार्यक्रमात साखर आणि सहयोगी उद्योगांमधील उद्योग नेते, तंत्रज्ञ, धोरणकर्ते आणि नवोन्मेषकांसह भारत आणि परदेशातून एक हजार पेक्षा अधिक प्रतिनिधी आणि 120 स्टॉल्स सामील झाले होते. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानावर 80 पेक्षा अधिक संशोधन प्रबंध सादर झाले.
संशोधन प्रबंधचे सादरीकरण करताना श्री दत्तचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी कारखान्याने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ऊस उत्पादन वाढीसाठीच्या ऊस विकास योजना, सेंद्रिय कर्ब वाढीसाठी केलेले विविध प्रयोग, दहा हजार एकरावरती सच्छिद्र पाईपलाईनच्या माध्यमातून झालेली जमीन क्षारपड मुक्ती आणि प्रत्यक्षात चार हजार एकर जमिनीमध्ये घेण्यात येत असलेले विविध पिकांचे उत्पादन यांचा संपूर्ण आढावा घेतला.
श्री. दत्त साखरचे मा. चेअरमन गणपतराव पाटील यांच्या क्षारपडमुक्तीच्या पॅटर्नचे कौतुक करून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस अमित खट्टर, दत्तचे संचालक इंद्रजीत पाटील, ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.