पुरस्कारामुळे गणपतराव पाटील यांच्या क्षारपड व पर्यावरण चळवळीला बळ !
“पर्यावरण जीवन गौरव” पुरस्कारानंतर स्व.डॉ.सा.रे.पाटील यांच्या आठवणी ताज्या झाल्या.
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
श्री दत्त साखर कारखान्याचे मा.चेअरमन गणपतराव पाटील यांचे क्षारपड क्षेत्रातील योगदान यापूर्वीच महाराष्ट्र ,कर्नाटक बरोबर संपुर्ण देशात पोहोचले आहे. हजारो हेक्टर क्षारपड जमीन सुधारून त्यामध्ये पिकांच्या माध्यमातून पर्यावरणातील समतोल राखण्यात अतुलनीय कामगिरी केली आहे.
या कार्याची दखल घेऊन एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया पुणे यांच्याकडून श्री गणपतराव पाटील यांना दि.25 जुलै रोजी “पर्यावरण जीवन गौरव” पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथे फिरोदीया सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात, महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या हस्ते पुणेरी पगडी, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
श्री गणपतराव पाटील यांना हा पुरस्कार क्षारपड जमीन सुधारणा व पर्यावरण समतोल अशा एकत्रित कार्याबद्दल दिला असला तरी, सहकार क्षेत्रात काम करत असताना त्यांनी आपले वडील स्व. डॉ.सा.रे .पाटील यांचा वारसा चालवत श्री दत्त साखरला अनेक पुरस्कार मिळवून दिले आहेत.
उत्कृष्ट कारखाना, उच्च्यांकी गाळप व साखर उत्पादन, सरासरी ऊस उत्पादनात वाढ, ऊस विकास योजना, साखर निर्यात, उत्कृष्ट व्यवस्थापन यासह सहकार क्षेत्राच्या माध्यमातून विविध पुरस्कार मिळवून श्री दत्त साखर कारखान्याचे नाव देशात पोहोचवले आहे.
एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया ही संस्था गेली सतरा वर्षे पर्यावरण क्षेत्रात काम करीत आहे. पर्यावरणाच्या अनुषंगाने ज्या संस्था किंवा व्यक्ती पर्यावरण पूरक असे काम करतात त्यांना ही संस्था “पर्यावरण भूषण” आणि “पर्यावरण गौरव” या पुरस्काराने सन्मानित करते.
क्षारपड जमीन सुधारणा करून त्यामध्ये पिकांच्या माध्यमातून उत्पादन घेण्याबरोबर पर्यावरण पूरक कार्य केल्याचे डोळ्यासमोर ठेवून संस्थेने पाटील यांना हा पुरस्कार प्रदान केला आहे. या प्रसंगी एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष आमोद घमंडे, सचिव गणेश शिरोडे व खजिनदार सचिन पाटील यांच्यासह राजेंद्र मिरजे, विश्वेश्वरय्या बँकचे उपाध्यक्ष व श्री दत्त साखरचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हॉइस चेअरमन शरदचंद्र पाठक, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील उपस्थित होते.