शरद काळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी शिरोळ तालुक्यात काही जणांशी संपर्क.
फिर्यादी शिवाप्पा कुंभारसह कटात सहभागी असणाऱ्यांच्या अडचणी वाढणार !
कोल्हापूर :
शिरोळ तहसील कार्यालयाचे बनावट व्हाउचर तयार करून शरद काळे यांना अपहाराच्या गुन्ह्यात अडकविण्याचा डाव आता चांगलाच अंगलट येणार अशी चिन्हे आहेत. बनावट व्हाऊचरचा सोक्षमोक्ष आता न्यायालयात होणार असून तक्रारदार यांच्यासह मोठ्या साहेबांच्या अडचणी वाढल्या आहेत.
दैनिक पुढारीचे तत्कालीन वार्ताहर शरद काळे यांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा नोंद करण्यात आला. शरद काळे यांना अटक करण्यासाठी पोलिसांचा ससेमीरा मागे लावण्यात आला. आपले वजन वापरून ससेमीरा मागे लावण्यात मोठे साहेब माहीर आहेत. त्यामुळे शरद काळे यांना अटक टाळण्यासाठी हायकोर्टापर्यंत धाव घ्यावी लागली. हायकोर्टाने जामीन मंजूर केल्याने मोठ्या साहेबांचे मनसुबे उधळले गेले.
एखाद्या वार्ताहराला बरबाद करण्यासाठी समाजात चांगुलपणाचा बुरखा घेऊन वावरणारे लोक किती खालची पातळी गाठतात, याचा प्रत्यय शरद काळे यांच्या प्रकरणात आला आहे.
शरद काळे यांना अपहाराच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी शिरोळ तहसील कार्यालयाचे बनावट व्हाउचर तयार करण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. आता हा प्रकार कोणी व कोणाच्या सांगण्यावरून केला, याचा तपास व्हावा यासाठी शरद काळे यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.
तक्रारदार शिवाप्पा कुंभार यांना अ .टक करून त्यांची कसून चौकशी केली तरच पडद्यामागच्या सूत्रधारांचा बुरखा फाटणार आहे. शासकीय कार्यालयाचे बनावट व्हाउचर करण्यापर्यंत धाडस कोणाच्या पाठबळावर करण्यात आले, ही गोष्ट लपून राहिलेली नाही. आपले कोणतीही यंत्रणा वाकडे करू शकत नाही हा फाजील आत्मविश्वास न्यायालयाच्या साक्षीने धुळीस मिळवण्याचा निर्धार शरद काळे यांनी केला आहे.
न्यायदेवतेवर शरद काळे यांचा विश्वास आहे. त्यामुळे न्यायालयात सत्याचा विजय होणार आहे, ही कळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आपले बिंग आता न्यायालयात फुटणार याची जाणीव झालेल्या तक्रारदार व कटातील सहभागी साथीदारांनी शरद काळे यांना नव्याने खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी शिरोळ तालुक्यात काहींशी संपर्क वाढवला आहे.
मोठ्या साहेबांचे हे वागणे बरे नाही, अशी खोचक प्रतिक्रिया, शरद काळे यांना अडकवण्यासाठी ज्यांना गळ घालण्यात आली, त्यांनी व्यक्त केली. कोल्हापुरात असले धंदे चालतात का ? अशी उलट विचारणा त्यांनी शरद काळे यांच्याकडे केली.
शरद काळे यांच्या बाबतीत पुन्हा मोठ्या साहेबांनी बनवाबनवी केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा शरद काळे यांनी जिल्हा पोलिस प्रमुखांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
आतापर्यंत ज्या ज्या वार्ताहरांना मोठ्या साहेबांनी धडा शिकवला आहे, त्यांना मानसिक आधार देण्याचा निर्धार शरद काळे यांनी केला आहे. अशा बोगस प्रकरणांची चौकशी व्हावी व दोषी व्यक्तीवर कारवाई व्हावी, यासाठी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह उपोषण करण्याचा इशारा शरद काळे यांनी दिला आहे.