बनावट दस्तऐवज करण्याच्या कटात सहभागी असणाऱ्या म्होरक्याचा फोटोसहित पर्दापाश होणारच !
फिर्याद देण्याची जबाबदारी शिरोळ तहसील कार्यालयाची ; लोकशाही दिनात तक्रार.
बनावट व्हाउचर प्रकरण पुराव्यासह जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शरद काळे यांची मागणी.
कोल्हापूर : विशेष वृत्त
खोट्या गुन्ह्यात गोवण्यासाठी शिरोळ तहसील कार्यालयाचे बनावट व्हाऊचर तयार करणाऱ्या विरुद्ध तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना द्यावेत, अशी मागणी शरद काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही दिनात केली. अर्जावर जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे तहसीलदारांनी कार्यवाही न केल्यास त्यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशारा काळे यांनी दिला आहे.
महाराष्ट्र शासनाचे सन 2016 चे प्रचलित धोरण आणि कॅश मॅनेजट प्रोग्रॅम अंतर्गत कोणतीही रक्कम रोखीने अदा करण्याची परवानगी नसताना, संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करून, विना सिरीयल नंबर, त्यावर एक रुपयाचे स्टॅम्प तिकीट लावून तसा दस्तऐवज तयार करून त्यावर रोखीने पैसे अदा केल्याचे व्हाउचर शिरोळ तहसील कार्यालयाने तयार केले आहे.
राज्य शासनाच्या प्रचलित धोरण पायदळी तुडवत, बेकायदेशीररित्या रोखीने पैसे अदा करुन त्याचे व्हाउचर देणाऱ्या शिरोळ तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी शरद काळे यांनी लोकशाही दिनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
हिच मागणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व महसूल कमिशनर यांना पाठवण्याबरोबर दिल्ली सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई व मुंबई उच्च न्यायालयाचे चीफ जस्टीस यांच्याकडे करण्यात आली आहे. असे बेकायदेशीर कामकाज करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश व्हावेत, असे त्यात म्हटले आहे.
दैनिक पुढारीचे तत्कालीन वार्ताहर शरद काळे यांच्या विरुद्ध अकाउंट मॅनेजर शिवाप्पा कुंभार यांनी दिलेल्या अपहाराच्या फिर्यादीमध्ये शिरोळ तहसील कार्यालयाचे बनावट व्हाउचर तयार करून त्यावर खोटी सही करून त्याखाली सागर कोळी यांनी स्वअक्षरात सदरचे बिल शरद काळे यांना दिले असल्याचे बेकायदेशीररित्या मनमानी पद्धतीने नमूद केले आहे.
बनावट दस्त ऐवजप्रकरणी शरद काळे यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पोलीस महासंचालक पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता साहेब आणि लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे यांच्याकडे संबंधितांवर फौजदारे गुन्हा दाखल करण्याची मागणी करून, न्यायालयात धाव घेतली आहे.
दरम्यान, खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या बनावट दस्तऐवजाचे प्रकरण बाहेर पडले. आता आपले बिंग फुटणार, बदनामी होणार, फोटो प्रसिद्ध होणार या भीतीने फिर्यादी शिवाप्पा कुंभार आणि त्याच्या अन्य साथीदारांनी शिरोळ, जयसिंगपूर आणि नृसिंहवाडी येथील तिघांना हाताशी धरून शरद काळे यांच्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्याचा नवा कट रचला आहे.
पण, शरद काळे यांनी अशा कटाला भीक घालत नाही, असा निर्धार बोलून दाखवला. आता बनावट दस्तऐवज तयार करणे, शासनाचा कायदा धाब्यावर बसवत रोखीने पैसे अदा करणे, बेकायदा व्हाउचर तयार करणे या प्रकरणी जिल्हा पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी व शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर हे काय निर्णय करतात, याकडे लक्ष लागले आहे.