अशी “तळमळ” नसणाऱ्यांना उद्घाटन समारंभातील “खुर्ची”चा हव्यास !
कोणतीही “कृती” न करणाऱ्यांना हवा आहे “मानसन्मान”?
आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या नागरिकांसाठी कोणते प्रयत्न केले?
कोल्हापूर : विशेष वृत्त
कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोल्हापूर येथे होणाऱ्या सर्किट बेंचचा दि. 17 ऑगस्ट रोजी उद्घाटन सोहळा होत आहे. या उद्घाटन सोहळ्याचे औचित्य साधून व्यासपीठावरील खुर्चीचा वेगवेगळ्या माध्यमातून पाठलाग सुरू असतानाच कोल्हापूर शहरात, ‘कोल्हापूर सर्किट बेंच….. आमचाही खारीचा वाटा……’अशा आशयाच्या फलकाने सर्वत्र चर्चा रंगली आहे.
सर्किट बेंचसाठी माणिकराव पाटील-चुयेकर यांनी आमरण उपोषण करून सहा जिल्ह्यासाठी दाखवलेली तळमळ विचारात घेण्यासारखी असून ती नजरेआड न करण्यासारखी असल्याची मत व्यक्त होत आहे. उलट अशी तळमळ नसणारे सर्किट बेंचचे श्रेय घेण्यासाठी पुढाकार घेऊन प्रमुख अतिथींच्या शेजारी कसे बसता येईल, यासाठी आटापिटा करीत असल्याबद्दल शहरात संताप व्यक्त होत आहे.
सरन्यायाधीश “भूषण गवई” साहेब यांनी कोल्हापूरला सर्किट बँकेची मंजुरी दिली. यासाठी “श्रीमंत छत्रपती शाहू महाराज” यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. राज्य शासनाला जागे करण्यासाठी “माणिक पाटील-चुयेकर” यांनी आमरण उपोषण केले. निव्वळ एसी रूममध्ये बसून, फुकटचे सल्ले देऊन, फोनाफोनी करून कोणतेही मोठे काम फत्ते होत नाही.
तरीसुद्धा काही जणांना कोणतीही “कृती” न करता मानसन्मान कशाला हवा आहे, अशी शहरात तिखट प्रतिक्रिया व्यक्त करून खंडपीठासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्या संदर्भात किती वेळा आणि कोणा कोणाकडे प्रयत्न केला असाही सवाल कोल्हापूरकर करीत आहेत.
वास्तविक पाहता सरन्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस, मुख्यमंत्री यांनी ज्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे दावे वेगवेगळ्या न्यायालयात प्रलंबित आहेत, अशा व्यक्तींना व्यासपीठापासून दूर ठेवणे महत्त्वाचे आहे. अशा व्यक्ती न्याय प्रक्रियेचा फायदा घेऊ शकतात, अशा भूमिकेतून अनेक पक्षकार शेतकरी आत्तापासूनच उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर निराशा नोंदवत आहेत.
कोल्हापूर सर्किट बेंचसाठी माहे फेब्रुवारी 2025 मध्ये माणिक पाटील-चुयेकर यांनी पाच ठिकाणी केलेल्या उपोषणाची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरला सर्किट बेंच देण्याची घोषणा केल्यानंतरच पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते सलग नऊ दिवसांचे आमरण उपोषण मागे घेतले.
कोल्हापूर खंडपीठ कार्यक्षेत्रातील प्रस्थापित सहाही जिल्ह्यातील महाराष्ट्राचे चार माजी मुख्यमंत्री व एक केंद्रीय राज्यमंत्री तसेच सहाही जिल्ह्याचे पालकमंत्री या कार्यक्षेत्रातील संसदेचे सर्वच्या सर्व नऊ लोकसभा सदस्य व दोन राज्यसभा सदस्य तसेच सहाही जिल्ह्यातील विधिमंडळातील 46 विधानसभा सदस्य व 13 विधानपरिषद सदस्य यांची कोल्हापूर खंडपीठास समर्थन देणारी पत्रे माणिक पाटील यांनी वैयक्तिकरित्या मिळवून ती मुख्यमंत्र्यांना सादर केली, असे फलकाव नमूद करण्यात आले आहे.