सन्मती बँकेचे अशोक पाटील व अन्य 24 जणाविरूध्द गुन्हा दाखल होत नसल्यामुळे घटना ?
कुरुंदवाड : खमक्या वृत्तसेवा
अब्दुललाट (ता. शिरोळ) शाखेत ठेवलेल्या ठेवीवर, “सन्मती बँके”चे कार्यकारी संचालक “अशोक पाटील” यांच्यासह 24 जणांनी, बँकेच्या तळंदगे शाखेत, परस्पर “बोगस कर्ज” खाते टाकून त्या रकमा परस्पर वापरल्याची तक्रार करून सुद्धा कुरुंदवाड पोलिसांकडून मागील चार महिन्यांपासून गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
पोलिसांकडून टाळाटाळ करून, सन्मती बँकेशी संलग्न असणाऱ्या संशयितांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करून, पोलिसांच्या कामकाज पद्धतीला वैतागून अब्दुललाट येथील मेथे दाम्पत्याने दि. 15 ऑगस्ट “स्वातंत्र्य दिन” दिवशी कुरुंदवाड पोलिस ठाण्यासमोर “आत्मदहन”चा प्रयत्न केला पोलिसांच्या सतर्कतेपणामुळे अनुचित प्रकार टाळला. या घटनेचे सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
कुरुंदवाड पोलीस ठाण्यातील या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून सन्मती बँक, कुरुंदवाड पोलीस ठाणे, कर्ज प्रकरण आणि ठेवी तसेच बँकेचे कार्यकारी संचालक अशोक पाटील व मेथे दंपत्य यांच्यात नेमके काय कनेक्शन आहे ? कोणता अन्याय व चुकीचे कामकाज झाले आहे ? अशा सवालात्मक चर्चेने कुरुंदवाड व अब्दुललाट परिसरात उधाण आले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, पिडित “संगीता मेथे” (रा.अब्दुललाट) यांनी दि.7 एप्रिल 2025 रोजी सन्मती सहकारी बँक शाखा अब्दुललाट येथे ठेवलेल्या ठेवीवर परस्पर बोगस कर्ज खाते टाकून रक्कमा वापरल्याची तक्रार कुरुंदवाड पोलीस ठाण्यात करून संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची मागणी अर्जाद्वारे केली होती.
कुरुंदवाड पोलिसांनी दखल घेतली नसल्यामुळे दि. 7 जून रोजी मेथे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे निवेदन दिले. दि. 9 जून 2025 रोजी एका आठवड्यात गुन्हे दाखल करतो असे अश्वासन देऊन आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यास भाग पाडले. गुन्हा दाखल करण्याच्या अनुषंगाने संगीता मेथे यांनी दि. 4 ऑगष्ट रोजी स्मरण पत्र पाठवून गुन्हे दाखल करण्यास विनंती केली.
दि. 15 ऑगष्ट रोजी आत्मदहनाचे निवेदन दिले, पण, पोलिसांनी निवेदनाची दखल घेतली नसल्याचा आरोप मेथे यांनी केला. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील याने दि.13 ऑगस्ट रोजी सचिन मेथे यांस अब्दुललाट औद्योगिक वसाहतीत गाठून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, याची तक्रार व्हॉट्सॲप वरून पोलिसांना देऊन गावातून बेपत्ता झाल्याचे मेथेंनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील व अन्य 24 जणांनी आमची फसवून करून उध्वस्त केले आहे, कुरुंदवाड पोलिसांकडून न्याय मिळत नाही. म्हणून पोलिस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. उपस्थित पोलिसांनी अटकाव केल्याचे मेथे यांनी सांगितले. यावेळी मेथे यांच्या आईने पोलिस ठाण्यासमोर प्रचंड आक्रोश करून पोलिस आणि सन्मती बँकेविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला.
वेचक मुद्दे
चौकशी ?, दोन वेळा अश्वासन पण, गुन्हा दाखल नाही, तक्रारदार पिडीतांनी काय करायचे ?
पोलिसांकडून टाळाटाळ ?, सन्मती बँकेशी संलग्न असणाऱ्या संशयितांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न ? मेथेंचा आरोप