बेंचचे श्रेय लाटण्याचा काहींचा प्रयत्न फसला; समारंभातून खड्यासारखे केले बाजूला
कोल्हापूर : खमक्या वृत्तसेवा
कोल्हापूर सर्किट बेंचचा उद्घाटन सोहळा आज रविवारी मोठ्या दिमाखात पार पडला. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठाचे उद्घाटन करण्यात आले. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारी सामाजिक न्याय व्यवस्था राबवून सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांना या खंडपीठाच्या माध्यमातून न्याय मिळेल, अशी खात्री सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कार्यक्रमात दिली.
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मुंबई येथून कोल्हापूर खंडपीठाची घोषणा केल्यानंतर काहींनी, हे खंडपीठ माझ्यामुळेच झाले, असा अपप्रचार चालवला. समाजात चुकीचा संदेश पसरवून सरन्यायाधीश भूषण गवई यांचे श्रेय पुसून टाकून स्वतः खंडपीठाचे प्रणेते असल्याचे भासवण्याचा व व्यासपीठावर खुर्ची मिळवण्याचा आटापिटा चालवला होता.
ही घुसखोरी झाली असती तर, न्याय व्यवस्थेबद्दल समाजात चुकीचा संदेश जाणार होता. न्यायाधीश माझ्या जवळचे आहेत, असे भासवून निष्पापांना न्याय मिळणार नाही, असे त्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न झाला असता. हा धोका ओळखून अनेकांनी सरन्यायाधीश भूषण गवई, चीफ जस्टिस अलोक आराध्ये तसेच शासनाकडे निवेदने पाठवली होती.
जिल्हा प्रशासनाने अत्यंत सुरेख आणि नियोजनबद्ध असा कार्यक्रम पार पाडला. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी खंडपीठासाठी दिलेले योगदान कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी कधीच विसरणार नाहीत.
मूलतः कोल्हापूर सर्किट बेंचचा उद्घाटन सोहळा न्यायिक व शासकीय व्हावा अशा सर्व स्तरातून झालेल्या मागणीची सरन्यायाधीश भूषण गवई आणि मुंबई हायकोर्टाचे चीफ जस्टीज अलोक आराध्ये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली. जिल्हा प्रशासनाने देखील प्रोटोकॉलचे तंतोतंत पालन केले.
त्यामुळे कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, सरन्यायाधीश व चीफ जस्टीस यांच्याबरोबर अन्य प्रमुख न्यायाधीश व जिल्हा प्रशासन यांना धन्यवाद देताना दिसून आले.
मुंगेरीलाल के हसीन सपने
सरन्यायाधीश गवई यांच्या पुढाकारामुळेच कोल्हापूरला खंडपीठ झाले, असे गौरवोद्गार काढत वक्त्यांनी त्यांचा देवदूत म्हणून उल्लेख केला. सोहळ्यात सरन्यायाधीश गवई यांच्यावरील चित्रफीत दाखवण्यात आली. यावेळी सरन्यायाधीश क्षणभर भावुक झाले होते. या समारंभात व्यासपीठावर सरन्यायाधीश यांच्या सोबत झळकण्याचे मनसुबे काहींनी रचले होते. शासन स्तरावरून निमंत्रण मिळण्यापूर्वीच त्यांच्या सोबत झळकणार, अशी वातावरण निर्मिती काहींनी केली होती. पण हा आटापिटा अखेर मुंगेरीलाल के हसीन सपने, या कथेत मोडणारा ठरला.