4 कोटी 10 लाख रुपये भरल्याचे रेकॉर्ड सादर ; पण,पैसे जमा न झाल्याची फायनान्स कंपनीची तक्रार.
सर्वोच्च न्यायालयाकडून या प्रकरणाची गंभीर दखल प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश.
कोल्हापूर : खमक्या वृत्तसेवा
अब्दुललाट येथील चैतन्य बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळाने थकीत कर्जापोटी 4 कोटी 10 लाख रुपये जमा केल्याचे रेकॉर्ड दाखवले. पण, सदरचे पैसे फायनान्स कंपनीच्या खात्यात जमा झालेले नाहीत, अशी गंभीर बाब ऑक्झिलो फिन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.चैतन्य समूहाकडून उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचा कारवाई टाळण्यासाठी वापर होत आहे, अशी गंभीर बाब निदर्शनास आणून दिली. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला स्थगिती आदेश काही क्षण देखील कायम ठेवू नये, या कंपनीच्या वकिलांच्या मताशी सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली.
परंतु, फायनान्स कंपनीला तारण दिलेल्या शिक्षण मंडळाच्या इमारतीत सुमारे 300 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या हिताचा विचार करून तातडीने स्थगिती उठवण्यास न्यायालयाने नकार दिला. चैतन्य शिक्षण प्रसारक मंडळाने पंधरा दिवसात पैसे अदा केल्या संदर्भातील सर्व तपशील प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयात सादर करावा असे आदेशही दिले. यावर आता 23 सप्टेंबर 2025 रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
चैतन्य बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाने, सर्वोच्च न्यायालयात पैसे भरण्याबाबत हमी दिली होती. त्यामुळे शिक्षण मंडळाची मालमत्ता ताब्यात घेण्याच्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. सदरचा स्थगिती आदेश मागे घ्यावा अशी याचिका ऑक्झिलो फीनसर्व्हिस प्रा. लिमिटेड या कंपनीने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.
न्यायाधीश दीपंकर दत्ता व न्यायाधीश ऑस्टिन मसीह यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. चैतन्य शिक्षण मंडळाने 3 जुलै 2025 रोजी दोन व्यवहाराद्वारे 2 कोटी व 2 कोटी 10 लाख असे 4 कोटी 10 लाख रुपये कंपनीऱ्या बँक खात्यात पाठवल्याचा दावा करून ट्राजेंक्शन आयडी नमुद केला आहे. पण, सदरचे पैसे फायनान्स कंपनीच्या खात्यावर जमा झाले नाहीत, अशी वस्तुस्थिती कंपनीच्या वकिलांनी निदर्शनास आणून देताच, खंडपीठाने शिक्षण मंडळाचे सर्वेसर्वा दशरथ काळे व शरद काळे यांना पंधरा दिवसात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.
शिक्षण मंडळाच्या विश्वस्तांनी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय येथे वेळोवेळी हमी दिली आहे. परंतु , त्याचे त्यांनी पालन केले नाही. ही बाब देखिल खंडपीठाने, न्यायालयीन कामकाजात नोंदवली आहे. तसेच कंपनीने खोट्या कागदपत्रासंदर्भात पोलीस ठाण्यात जी तक्रार दिली आहे, त्याची रीतसर चौकशी करावी, आणि उचित निष्कर्ष काढून कारवाई करावी. असे निर्देश कोल्हापूर पोलिसांना दिले आहेत.
चैतन्य शिक्षण मंडळाने यापुढे नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नयेत. व न्यायालयाने या संदर्भात दिलेल्या आदेशाची प्रत शाळेच्या नोटीस बोर्डावर लावून विद्यार्थी व पालकांच्या निदर्शनास आणून द्यावी. असे निर्देश जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच या विद्यार्थ्यांना परिसरातील कोणत्या शाळांमध्ये सामावून घेणे शक्य आहे का ? यासंदर्भात एक महिन्यात महाराष्ट्र सरकारचे निर्देश घेण्याची सूचना राज्य सरकारच्या वकीलांना केली. त्यामुळे, या शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.