राजकीय धार्जीन, निष्काळजीपणा, कर्तव्यात कसूर अशा प्रचंडरावांच्या कामकाजाला “जैसे कर्म वैसे फळ” असे म्हणायचे ?
आंदोलक पृथ्वीराजसिंह यादव, शिष्टमंडळ आणि जिल्हाधिकारी यांच्यात बैठक, मागण्या मान्य, आंदोलनाला आले यश !
कोल्हापूर/शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
पाणीपुरवठा योजनेबाबतच्या प्रत्येक बैठकीत शिरोळचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी जिल्हा प्रशासनाला अंधारात ठेवल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. प्रशासक असताना राजकीय धार्जीनी काम केल्याची माहिती मिळते. कोणतेही सबळ कारण नसताना ठेकेदाराला मुदतवाढ देऊन पाणीपुरवठा निर्धारित वेळेत पूर्ण करून घेतला नाही.
अन्य शासकीय कामात प्रचंड निष्काळजीपणा, कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट दिसत आहे.त्यामुळे मुख्याधिकारी यांच्या कामकाजाची संपूर्ण माहिती घेण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने त्यांना कामावर बोलवण्याचे बंद केले आहे.
एकूणच प्रचंडराव यांच्या कामकाज पद्धतीनुसार त्यांना बेमुदत सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा आदेश पारित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बुधवारी शिरोळच्या शिष्टमंडळाला दिली.
प्रचंडराव यांच्या राजकीय धार्जीन, निष्काळजीपणा, कर्तव्यात कसूर अशा कामकाज पद्धतीची विभागिय चौकशी होऊन निलंबन करायचे की, बडतर्फ याचा लवकरच निर्णय होणार आहे.
शिरोळ नगरपरिषदेच्या 26 कोटी रुपयांच्या अमृत पाणीपुरवठा योजनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी येडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. ठेकेदार आणि सल्लागार यांच्यावर जबाबदारी निश्चित केली जाईल. 28 जुलै पर्यंत योजना कार्यान्वित न झाल्यास पालकमंत्री जिल्हा प्रशासन आणि शिष्टमंडळात चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार.
शिरोळ मधील आंदोलनकर्ते पृथ्वीराजसिंह यादव आणि त्यांच्या टीमने अत्यंत अभ्यासपूर्ण आणि शहरातील नागरिकांच्या हिताचे मुद्दे उपस्थित केल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले. उपस्थित मुद्द्यांमुळे जिल्हा प्रशासनालाही स्थानिक पातळीवर होणाऱ्या वेगवेगळ्या कामकाज पद्धतीची माहिती मिळाल्याचे सांगितले.
पाणी योजनेसाठी शासनाने निधी दिला आहे. त्यामुळे ठेकेदार आणि सल्लागार यांचा विचार करण्याची किंवा मत घेण्याची आवश्यकता नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी बैठकीत स्पष्ट केले.पाणीपुरवठा योजना कामकाज निर्धारित वेळेत होवून नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे आणि योजना दणकट आणि मजबूत व्हावी अशी आंदोलकांची भावना असल्याचे या बैठकीतून स्पष्ट दिसत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी बैठकीत नमूद केले.
दरम्यान शिरोळला कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्यावा अशी करण्यात आलेल्या मागणीला उत्तर देताना येडगे म्हणाले, नव्या मुख्याधिकाऱ्यांची मागणी करण्यात आली आहे. लवकरच निर्णय होईल असे सांगितले.