उद्घाटनासाठी अपुरी पाणी योजना सुरू करण्याचा डाव, शिरोळकर राजकीय डाव मोडून, घालतील त्याच्या राजकिय भवितव्यावर घाव !
शिरोळ अमृत पाणी योजनेच्या दिरंगाई बाबत ठेकेदार व सल्लागार मंडळींची जिल्हास्तरावर माया-प्रेमाची भाषा
शिरोळ शहराला भुयारी गटारीची आवश्यकता आहे की, नाही. याचा तज्ञ मंडळी मार्फत सर्व्हे करण्याची आवश्यकता.
शिरोळ/जयसिंगपूर/कुरुंदवाड : खमक्या वृत्तसेवा
शिरोळ नगरपरिषदेच्या अमृत पाणी योजनेच्या दिरंगाई बाबत ठेकेदार व सल्लागार मंडळींनी जिल्हास्तरावर माया-प्रेमाची भाषा केल्याची चर्चा सुरू आहे. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची माया प्रेमाच्या भाषेची बुधवारी एका झटक्यात बोलती बंद करून टाकली आहे.
दरम्यान, शिरोळ नगरपरिषदेचा प्रभारी चार्ज एका महिलेला देण्यात यावा. चार्ज घेतल्यानंतर तात्काळ भुयारी गटारीचे काम सुरू करून ठरलेल्या गोष्टी करून घेण्यासाठी शिरोळमधून हालचाली गतिमान करण्यात आल्या असल्याचे समजते.
शिरोळ नगरपरिषदेचे कामकाज इतर नगरपरिषदांच्या तुलनेत संवेदनशील असल्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्याची मागणी करण्याऐवजी प्रभारी अधिकारी देण्याचा हट्ट कशासाठी ? या प्रश्नाने शिरोळकरांची डोकी सुन्न झाली असल्याची चर्चा आहे.
प्रभारी अधिकारी म्हणून महिलेला अधिकार मिळावेत अशी मागणी करणाऱ्या मंडळींच्या ओंजळीने शिरोळची जनता पाणी पिणार ? की, हा मुद्दा शहराच्या अस्मितेचा करणार ? हे लवकरच समजणार असल्याचे बोलले जात आहे.
याच दरम्यान, पाणीपुरवठा योजना निवडणुकीपूर्वी तात्काळ पूर्ण करा मला उद्घाटन करायचे आहे. असा तगादा काही मंडळींनी लावला असल्याची चर्चा आहे. वास्तविक पाहता, पृथ्वीराजसिंह यादव यांच्या आंदोलनामुळे बाहेर पडणाऱ्या कामकाजाची तीव्रताच शहराला दिशादर्शक ठरणारी आहे, याचाही तितकाच विचार होणे आवश्यक असल्याचे नागरिक बोलत आहेत.
शिरोळ नगरपरिषदेचा चार्ज एका महिला अधिकाऱ्याला देऊन तात्काळ भुयारी गटारीचे काम सुरू करण्याचा चंग बांधल्याचे कळते. परंतु, शिरोळ शहराला खऱ्या अर्थाने भुयारी गटारीची आवश्यकता आहे की, नाही. याचा तज्ञ मंडळी मार्फत सर्व्हे करून निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे नागरिक बोलत आहेत.
प्रभारी अधिकार घेण्यास उत्सुक असलेली महिला अधिकारी सुरुवातीला अधिकाराचा वापर करून सर्वांना दाबण्याचा प्रयत्न करत असल्याची अशी चर्चा आहे. परंतु, तक्रारदार नागरिकांनी केवळ खुर्ची समोर ठेवून पाठलाग केल्यास आपोआपच मागे हटते अशीही जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरोळ परिसरात चर्चा सुरू आहे.