माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज संस्था चालकांकडून पंचवीस हजार रुपये कमिशनवर अकॅडमीला, विद्यार्थ्यांची विक्री.
विद्यार्थ्यांने अकॅडमी सोडून जायला पाहिजे, असा छळ करण्याचा पॅटर्न “त्या” अकॅडमी कडून राबवला जातो.
तांबे अकॅडमीला विद्यार्थी पुरवणाऱ्या शिक्षण संस्थांचा परवाना रद्द करावा अशी मागणी.
इचलकरंजी : खमक्या वृत्तसेवा
इचलकरंजी येथील आप्पासाहेब तांबेच्या अकॅडमी घडलेल्या प्रकारानंतर, अकॅडमी म्हणजे विद्यार्थी घडवण्याचे केंद्र नसून पैसे मिळवण्याबरोबर विद्यार्थ्यांचा घात करणारे केंद्र अशी नवी व्याख्या विकसित होत निघाली आहे.
माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज संस्था चालकांनी एका विद्यार्थ्यामागे पंचवीस हजार रुपये कमिशन या प्रमाणे इयत्ता नववी पासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची अकॅडमीला थेट विक्री करून मालामाल होण्याचा काळा बाजार सुरू केला आहे.
विद्यार्थी शिकला काय ?, अकॅडमी सोडला काय ?, शिक्षण घेऊन मोठा झाला काय ?, तो डिप्रेशन मध्ये गेला काय ? आणि त्याने आत्महत्या केली काय ? याच्याशी माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज संस्थांचे चालक आणि अकॅडमी चालक यांना कोणतेही सोयरसुतक नसल्याचे समोर येत आहे.
शिक्षणाचा बाजार मांडून, विद्यार्थ्यांची पिळवणूक करून, पालकांच्या खिशातील पैसा काढून घेऊन स्वतः गब्बर होण्याचा अकॅडमी चालक व शिक्षण संस्था चालकांचा हा डाव मुळासह उपटून टाकण्याची आवश्यकता असल्याची मते नोंदवली जात आहेत.
जास्तीत जास्त पैसा मिळावा या उद्देशाने, जास्तीत जास्त ऍडमिशन घ्यायचे. पैसे जमा झाले की, विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता तपासून त्याची पिळवणूक सुरू करायची. जेणेकरून त्याने एक तर आत्महत्या करायला हवी, किंवा त्याने अकॅडमी सोडून पळ काढला पाहिजे. अशी परिस्थिती निर्माण करायची.
प्रत्येक वर्षी तांबे अकॅडमीमध्ये मानसिक व शारीरिक छळ आणि अभ्यासाच्या दबावामुळे पस्तीस टक्के विद्यार्थी अकॅडमी सोडून जातात. सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांची पैसे परत देण्याऐवजी तांबे नियम अटीकडे बोट करून पस्तीस टक्के विद्यार्थ्यांची पैसे वरच्यावर मिळवून थेट फसवणूक करतात, असा आरोप इचलकरंजी शहरातून होत आहे.
इचलकरंजी शहराबरोबर शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज संस्था चालकांचे कमिशन बेसवर तांबे अकॅडमी बरोबर कनेक्शन असल्याची चर्चा आहे. याशिवाय तांबे अकॅडमीला विद्यार्थी पुरवणाऱ्या शिक्षण संस्थांचा परवाना रद्द करावा अशी मागणी पुढे आली आहे.