पैसे खाण्याच्या उद्देशानेच जादा दराने टेंडर , विरोधकांनीही आक्षेप घेतला नाही ; धनाजी चुडमुंगे.
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
शिरोळ नगरपरिषद मधील तत्कालीन सत्ताधारी कारभाऱ्यांनी विकास कामाचे ठेके देताना जवळपास प्रत्येक निवीदा सरासरी अंदाजपत्रकीय दरापेक्षा 5 टक्के जादा दराने देऊन 5 वर्षात 6 कोटींचा ढपला पाडला आहे. नागरीकांनी मते देऊन निवडून दिलेल्या कारभाऱ्यांनी शिरोळकरांचा विश्वासघात केल्याचा आरोप आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
शासकीय विश्रामगृहावर पार पडलेल्या पत्रकार बैठकीत चुडमुंगे म्हणाले, सन 2018/19 ते 2022/23 या 5 वर्षाच्या कार्यकाळात शासनाने 166 विकास कामासाठी अंदाजे 125 कोटीचा निधी मंजूर केला होता. कामांचे टेंडर देताना कारभाऱ्यांनी अंदाजपत्रकापेक्षा सरासरी 5 टक्के आणि कल्लेश्वर तलावाच्या कामाचे टेंडर 6 टक्के तर . काही टेंडर 7 टक्क्यापेक्षा जादा दराने देऊन मोठा ढपला पाडला आहे.
शिरोळ नगरपरिषदेमध्ये प्रशासकांनी कारभार स्विकारल्यानंतर सर्व टेंडर 10,15 आणि 4 टक्के कमी दराने दिली आहेत. मात्र, 5 वर्ष एकहाती सत्ता ज्या कारभाऱ्यांकडे होती, त्यांनी मात्र, जादा दराने टेंडर देवून जनतेला पद्धतशीर फसवल्याचे स्पष्ट झाले आहे. पण, या प्रकाराला विरोधी नगरसेवकांनी सभागृहात कुठेही आक्षेप घेतला नाही.
नागरिक, मतदारांनी विश्वासाने एकहाती सत्ता दिलेल्या कारभाऱ्यांनी जनतेची दिशाभूल आणि विश्वासघात करून कोट्यावधी रुपयांचा ढपला पाडल्याचे कागदपत्रावरून स्पष्ट होत आहे. एका कल्लेश्वर तलावाच्या कामात जादा 6 टक्के दराने निविदा काढून थेट 30 लाख रुपयांचा ढपला पाडल्याचे सांगून या भ्रष्टाचार प्रकरणाची लवकरच जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे चुडमुंगे यांनी पत्रकार बैठकीत नमूद केले.
पत्रकार बैठकीस दीपक पाटील, अक्षय पाटील, भोसले सर, भारत ढाले, डॉ. शिवाजी पाटील, महादेव काळे, प्रवीण माने, संपत मोडके पाटील, बंटी माळी, आनंदा भातमारे, अवधूत काळे, शशिकांत काळे, सोमनाथ तेली आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
जादाचे 5 टक्के आणि प्रथेचे 25 टक्के, एकूण 31 कोटी रुपयांचा चुना
विकास कामांचे गाजर दाखवून शिरोळकरांच्या हक्काच्या पैशाची कशी लूट केली ? याची पुराव्यासह प्रकरणे बाहेर पडू लागली आहेत. नव्याने होत असलेला पाणीपुरवठा व नळ कनेक्शन, बेकायदा घनकचरा ठेका, घरफाळा-पाणीपट्टी कर, दिवाबत्ती, मनुष्यबळ पुरवणे ठेका, रस्ते-गटारी, वेगवेगळी सभागृहे, तालीम, कल्लेश्वर तलाव सुशोभीकरण, दत्त कारखाना बांधकाम परवाना व ठोक अंशदान, कामगार समावेशन.
या सर्व कामामध्ये 5 टक्के, जादा दराने दिलेली निविदा वगळून, प्रथेप्रमाणे प्रत्येक कामात मिळणारे 25 टक्के कमिशन असा एक हिशोब घातला तर, शिरोळकरांना सरासरी 31 कोटी रुपयांचा चुना लावण्याची चर्चा आंदोलन अंकुशच्या पत्रकार बैठकीनंतर शिरोळ शहरात रंगली होती.