शिरोळ संजय गांधी निराधार विभाग व एजंटांचे संगणमत ?, दामाजीपंतात कोणा-कोणाचा सहभाग ?
मंजूर पत्रे एजंटांपर्यंत कोणी पोहोचवली ?, वादग्रस्त विभागाचे, पुन्हा वादग्रस्त कामकाज ?
तहसीलदार हेळकर चौकशी करून कारवाई करणार की, पाठीशी घालणार ?
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
शिरोळ तहसील कार्यालयाच्या संजय गांधी निराधार विभागाने, अनुदानास पात्र असलेल्या लाभार्थ्यांना, शासनाच्या कर्मचाऱ्यांकडून “मंजुरीचे पत्र” देण्याऐवजी “दामाजीपंताला” चटावलेल्या “एजंटा”करवी पत्र वाटप केली जात असल्याची खळबळजनक माहिती चर्चेत आली आहे.
तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी स्वाक्षरी केलेल्या मंजूर यादीतील लाभार्थ्यांची पत्रे एजंटापर्यंत पोहोचतात कशी ? यासाठी स्पेशल इन्वेस्टीगेशन करण्याची गरज नसल्याचे लोक बोलत आहेत. एजंटापर्यंत पत्रे पोहोचवणारी यंत्रणा दामाजीपंतामध्ये सहभागी असल्यानेच असे प्रकार घडत असल्याची चर्चा सुरू आहे.
नियमांनुसार अनुदान मंजुरीची पत्रे मंडल अधिकारी व ग्रामविकास अधिकारी कार्यालयाच्या कोतवाल किंवा उमेदवारांकडून वाटप केली जातात. परंतु सध्या, वाटप होत असलेली पत्रे एजंटांपर्यंत पोहोचवली कोणी ? याला तहसीलदार हेळकर यांची मुखसंती आहे का ? अशी सवालात्मक चर्चा होत आहे.
गेल्या अनेक वर्षापासून शिरोळ तहसील कार्यालयाचा संजय गांधी निराधार विभाग “वादग्रस्त” या नावाने सुपरिचित असल्याचे अनेक वेळा बोलले गेले आहे. या ठिकाणी अनावश्यक मागणी करून, विविध प्रश्नासाठी येणाऱ्या गोरगरीब, निराधार ,अंध, अपंग, वयस्क, विधवा, परितक्त्या नागरिकांना अभद्र वागणूक दिली जाते असा आजही आरोप होत आहे.
शासनाची मंजूर पत्रे एजंटांमार्फत वाटप होत असतील तर, संजय गांधी विभागाचे एजंटांबरोबर संगणमत असल्याचे ठाम मत नागरिक मांडत असल्याचे समजते. संजय गांधी मध्ये एजंटांचा सन्मान का राखला जात आहे ? याच्या मुळाशी जाऊन संबंधितावर तहसीलदार, प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांनी कारवाई करावी अशी मागणी होत आहे.