खाजगी उमेदवार काढल्यामुळे कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडणार.
लखपती उमेदवारांना मिळणार “पुरस्काराची अमूल्य भेट”, मागे वळून पाहू नका, घराकडे जावा थेट !
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
येथील तहसील कार्यालयाचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर साहेब यांना काही दिवसापूर्वी उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल आदर्श तहसीलदार म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत गौरवण्यात आले आहे. या पुरस्काराचा सन्मान आणि आदर करीत हेळकर साहेब यांनी तहसील कार्यालयातील कामकाजाबाबत काही महत्वपूर्ण निर्णय घेतल्याची चर्चा तहसील कार्यालयातील कर्मचारी वर्तुळात सुरू आहे.
गेली अनेक वर्षे तहसील कार्यालयातील पुरवठा, संजय गांधी, आस्थापना, निवडणूक शाखा, महसूल रेकॉर्ड विभाग या ठिकाणी 18 उमेदवार बेकायदेशीर रित्या कार्यरत आहेत. अनेक लाखोंची संपत्ती जमवलेल्या आणि बेकायदेशीर रित्या बसवलेल्या उमेदवारांना घेऊन, तहसीलदार हेळकर साहेब यांनी अनेक शासकीय कामे चांगल्याच पद्धतीने हाताळल्याचे चर्चेत आहे.
दरम्यान, तहसील कार्यालयात बेकायदेशीर ठिय्या मारून, टेबल खुर्ची टाकून, पंख्याखाली बसलेल्या उमेदवारांच्या “खेळकर वृत्ती”मुळे महसूल वरिष्ठ कर्मचारी व अधिकारी यांना अडचणीतून मार्ग काढावा लागल्याची चर्चा आहे. बेकायदेशीर रित्या बसलेल्या उमेदवारांमुळे तहसील कार्यालयाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू नये, अडचण निर्माण होऊ नये म्हणून उमेदवारांबाबतीत लवकरच निर्णय घेणार असल्याची कळते.
आदर्श तहसीलदार म्हणून मिळालेल्या पुरस्कार अनुषंगाने तहसीलदार हेळकर साहेब, तहसील कार्यालयात बेकायदेशीर रित्या, शासकीय नोकर नसताना, खुर्ची टेबल टाकून, काम करणाऱ्या उमेदवारांना घरचा रस्ता दाखवणार असल्याचे चर्चेत आले आहे. हेळकर साहेब यांनी आपल्या कार्यकालात सुरुवातीलाच बेकायदा उमेदवारांचा निर्णय घेणे ऐवजी तब्बल दीड वर्षानंतर का ? असाही सवाल तहसील वर्तुळात केला जात असल्याचे समजते.
दरम्यान, जिल्हाधिकारी व इचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालय पातळीवर अनेक वेळा अनेक संघटना, कार्यकर्त्यांनी शिरोळ तहसील कार्यालयात खाजगी नेमणूक केलेल्या उमेदवारां बाबतीत तक्रारी केल्या. पण, त्याची दखल घेण्यात आली नव्हती. परंतु, तहसीलदार हेळकर साहेब यांनी ही बेकायदेशीर उमेदवार पद्धती आता मोडून काढण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.